Nashik : क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेशशुल्क माफ, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

क्रीडा स्पर्धा,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हाधिकार्‍यांनी क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेश शुल्क माफ केल्याने नाशिक जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या संघर्षाला यश मिळाल्याची माहिती जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष प्राचार्य संजय चव्हाण यांनी दिली.

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या मनमानी कारभाराला वेसण बसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. सर्व शाळांनी भरलेले प्रवेशशुल्क 50 टक्के माफ करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी मान्यता दिली असून, जिल्हापातळीवरील स्पर्धा ऑफलाइन घेण्याबाबत सोमवारी शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांनी भरलेले शुल्क 50 टक्के परत मिळणार आहे. परंतु संघटना यावर थांबणार नाही. डिसेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक संघाकडून पन्नास रुपये आणि वैयक्तिक खेळाडूकडून 25 रुपये इतकेच शुल्क घेण्याचा अधिकार क्रीडा कार्यालयाला असताना त्यांनी विद्यार्थ्यांची आणि विनाअनुदानित अनुदानित शाळांची लूट केलेली आहे. या मनमानी विरोधात क्रीडा संघटनेने संघर्ष सुरू केल्याने तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धा ऑफलाइन करण्याचा निर्णय झालेला आहे . जिल्हापातळीवरील कोणताही संघ सहभागापासून वंचित राहिला तर संघटना सदर स्पर्धा जागेवर बंद पाडेल, असा इशारा प्राचार्य संजय चव्हाण यांनी दिला आहे.

क्रीडा अनुदानाची चौकशी करा
2017 पासून आजपर्यंत वाटप करण्यात आलेले क्रीडा साहित्य अनुदान आणि इतर अनुदानाच्या बाबतीत चौकशी करण्यात यावी, तसेच लॉकडाऊन सुरू असताना अडीच कोटींच्या क्रीडा साहित्याचे वाटप क्रीडा कार्यालयाने केल्याची खात्रीलायक माहिती आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. खेळाडू कल्याणचे नावाखाली न 2011 पासून जमा केलेली एक कोटी रुपयांच्या मुदतठेव व्याजातील एक रुपयासुद्धा अकरा वर्षांत वापरलेला नाही. ही शासकीय रक्कम अडवण्याला जबाबदार अधिकार्‍याच्या चौकशीतून क्रीडा विभागातील आर्थिक घोटाळा बाहेर येण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.

ज्यांची ऑनलाइन नोंद झालेली नाही त्यांनीही ऑफलाइनसाठी मुख्याध्यापकांचे ओळखपत्र आणून स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. जर खेळू दिले नाही तर ती स्पर्धा आहे, त्या ठिकाणी बंद पाडली जाईल. क्रीडाशिक्षक संघटनेच्या आंदोलनाला जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक सेना, माध्यमिक शिक्षक संघ (टीडीएफ) सह जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा पाठिंबा आहे.
– संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटना

हेही वाचा :

The post Nashik : क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेशशुल्क माफ, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय appeared first on पुढारी.