
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक व मतदार धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देवळाली गाव येथे आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी दिला.
दहा ते पंधरा दिवसांपूर्वी येथील प्रभाग क्रमांक 21 चे शिवसेना नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले तसेच माजी नगरसेवक प्रताप मेहरोली, प्रभाग 19 चा नगरसेविका जयश्री खर्जुल तसेच राजू लवटे, श्याम खोले आदींनी शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 21 व 22 मध्ये ठाकरे गटातील निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक देवळाली गाव येथील यशवंत मंडईमध्ये आयोजित करण्यात आली होती. बैठकीला निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केल्याने बैठकीचे रूपांतर मेळाव्यात झाले. लवटे बंधूंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या यशवंत मंडईमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण नाशिकरोडवासीयांचे लक्ष लागले होते. मेळाव्याच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मेळाव्यामध्ये शिवसेना उपनेते बबनराव घोलप, सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विनायक पांडे, वसंत गिते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर या सर्वच नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांवर टीकेची झोड उठविली. या प्रभागात गद्दारांचा पराभव करून शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आतापर्यंत ज्यांनी शिवसेनेचे गद्दारी केली ते संपले आहेत. शिवसेनेची खरी ताकद या मेळाव्याद्वारे दिसत आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासोबत कोणीही निष्ठावंत शिवसैनिक गेला नाही. खरा व निष्ठावंत शिवसैनिक हा समोर बसलेला आहे, असे नेत्यांनी यावेळी सांगितले. यापुढे सर्व शिवसैनिकांनी एकजूट ठेवून आगामी काळात महापालिकेवर भगवा फडकवावा, असे आवाहनही या मेळाव्यात करण्यात आले.
याप्रसंगी जयंत गाडेकर, सुधाकर जाधव आदींचे भाषणे झाली. याप्रसंगी माजी नगरसेवक संतोष साळवे, सुनीता कोठुळे, रंजना बोराडे, प्रशांत दिवे, माजी आमदार योगेश घोलप, मंगला आढाव, शिवसेना महिला आघाडीच्या भारती ताजनपुरे, शोभा मगर, ॲड. पद्मा थोरात तसेच नितीन चिडे, योगेश देशमुख आदी शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा :
- 2024 च्या विधानसभेला समोरासमोर लढू; दत्तात्रय भरणे यांचे हर्षवर्धन पाटील यांना आव्हान
- नगर : पहिले स्रीशिक्षिका साहित्य संमेलन ; स्त्रीशिक्षिका व साहित्यिकांना विविध पुरस्कार जाहीर
- असून अडचण, नसून खोळंबा! पौडरोड परिसरातील पीएमपी बसथांब्यांची स्थिती
The post Nashik : गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, मेळाव्यात सेना नेत्यांचा इशारा appeared first on पुढारी.