Site icon

Nashik : गवती कुरण लागवडीतून वन्यजीव संवर्धनाला ‘बूस्ट’

नाशिक : जिल्ह्यातील येवला व नांदगाव या दोन तालुक्यांच्या सीमारेषेवर पसरलेला गवताळ उघडया माळरानाचा तब्बल 5445.955 हेक्टर (54.46 चौ. किमी) हा वनप्रदेश काळविटांच्या नैसर्गिक अधिवासासाठी अतिशय अनुकूल आहे. विस्तृत गवती माळ क्षेत्रात स्थानिक स्थळ वैशिष्ट्यांमुळे या ठिकाणी काळवीट, लांडगा, तरस, खोकड, कोल्हा, रानमांजर, उदमांजर, ससा, मुंगूस, सायाळ आदी वन्यप्राणी व विविध प्रजातीचे पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक व उभयचर वन्यजीवांचे उत्तम अधिवास क्षेत्र आहे. या क्षेत्रातील काळवीट व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी २४ जून २०१४ रोजी ममदापूर संवर्धन राखीवची स्थापना झाली.

ममदापूर संवर्धन राखीव ही गवताळ परिसंस्था आहे. या भागात वर्षानुवर्षे झालेल्या चराईमुळे गवताच्या चांगल्या प्रजाती नष्ट होऊन कुसळीसारख्या प्रजातींची वाढ झाली. परिणामी, जंगलात चारा उपलब्ध न झाल्याने काळविटांनी आपला मोर्चा आजूबाजूच्या परिसरातील शेतीकडे वळविला. वाहनांना धडकणे, विहिरी-शेततळ्यात पडणे, पिकांचे नुकसान होणे अशा गोष्टी घडू लागल्याने जनसामान्यांमध्ये काळविटांबाबत आक्रोश, संताप निर्माण होऊ लागला व वनविभागाबद्दल आकस, हा आकस कमी करण्यासाठी, काळविटांना त्यांचे नैसर्गिक अधिवासात चारा व पाणी उपलब्ध करून देणेसाठी कॅम्पा योजनेंतर्गत गवती कुरण विकास व जल व मृदसंधारण कामे घेण्यात आली आहेत. जेणेकरून कुरणांचा विकास होईल व वन्यजीवांचा अधिवास समृध्द होऊन वन्यजीवांना वनांमध्येच पौष्टिक व सकस चारा उपलब्ध होऊन मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वन्यजीव संपदा वाढीस लागेल.

गवती कुरण विकास अंतर्गत पहिल्या टप्प्यात वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात स्थानिकरीत्या सहज चालू शकणाऱ्या पौष्टिक गवत प्रजातींची ओळख करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात चांगल्या व यशस्वी गवती कुरणास भेटी देण्यात आल्या. या सर्व अनुभवातून व प्रशिक्षणातून चौथ्या टप्प्यात पौष्टिक, सकस गवत प्रजातींची रोपवाटिका तयार करण्यात आली. पूर्व पावसाळी गवती कुरण क्षेत्रांची निवड करून पावसाळ्यात गवत प्रजातीची शास्त्रोक्त लागवड करण्यात आली. अंतिम टप्प्यात या गवती कुरणांची (रोपवन) व्यवस्थित देखभाल करून त्यापासून बी गोळा करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.

गवती कुरण विकास अंतर्गत घेण्यात आलेल्या रोपवनांमुळे काळविटांना सकस चारा उपलब्ध होऊ लागला असून, काळविटांचे रस्ते अपघात, शेततळे-विहिरीत पडून जखमी होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. वनविभागामार्फत सन २०२०-२१ मध्ये 60.00 हेक्टर तर सन 2021-22 मध्ये 40.00 हेक्टर क्षेत्रावर कुरण विकासाची कामे झाली आहे. या प्रयत्नांचे फलित स्वरूप म्हणून गवतांची वाढ चांगली झाली. काळविटांचा वावर या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला. हे कुरण क्षेत्र महाराष्ट्रातील इतर भागात गवती कुरण विकासास चालना देणारे ठरून बीज पुरविण्यांचे केंद्र झाले आहे.

वडपाटी नर्सरीत रोपनिर्मिती

गवती कुरण क्षेत्र विकसित अंतर्गत शेडा, पवण्या, दीनानाथ, डोंगरी, बेर, मारवेल, अंजन यांसारख्या गवताच्या प्रजातींची लागवड केली जात आहे. त्यासाठी येवला तालुक्यातील राजापूर येथील वडपाटी पाझर तलावाजवळ वनविभागाच्या जंगलात गवती रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेत गवताच्या विविध प्रजातीच्या बियांच्या माध्यमातून रोपनिर्मिती केली जात आहे.

– उमेश वावरे, उपवनसंरक्षक पूर्व वनविभाग, नाशिक

हेही वाचा :

The post Nashik : गवती कुरण लागवडीतून वन्यजीव संवर्धनाला 'बूस्ट' appeared first on पुढारी.

Exit mobile version