Nashik : गाफील राहिल्याने आमच्या जागा घटल्या: मुख्यमंत्री शिंदे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटे नॅरेटिव्ह सेट केले. याबाबतीत आम्ही गाफील राहिलो. त्यामुळेच आमच्या जागा घटल्या. मात्र, आमचा स्ट्राइक रेट चांगलाच आहे. पराभवाचे उट्टे काढण्याची संधी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

येथे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत शैक्षणिक संस्थांच्या बैठका घेण्यासाठी आले असता, ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, किशोर दराडे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांनी संविधान बदलण्याचे खोटे नॅरेटिव्ह सेट केले होते. डॉ. आंबेडकरांनी तयार केलेले संविधान बदलणार असा संदेश पसरवला गेला. त्यात आपल्याकडे कांद्याचा प्रश्न होता तसेच आमचा उमेदवार घोषित करण्यास विलंब झाला. या सर्व चुका महायुतीकडून झाल्यात. त्यामुळे आता येत्या निवडणुकांमध्ये सजग राहू असे त्यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत आपण अजेंडा घेऊन काम केले. त्याचवेळी विरोधकांकडे फक्त मोदी हटाव असा एकच नारा होता. राज्यात महायुतीचे उमेदवार पडले, तरी केंद्रात एनडीएचे सरकार आले. मोदीच पंतप्रधान झाले, तरीदेखील विरोधक ढोल वाजवत होते. याचा अर्थ गिरे तो भी टांग उपर असाच होतो. असादेखील खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला.

बॅनरवर अजित पवार, मात्र पदाधिकारी गायब

बैठकीच्या वेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे फोटो होते. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांचाही समावेश होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.

हेही वाचा: