नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परराज्यात मद्यविक्रीस परवानगी असलेल्या मात्र महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाठलाग करून जप्त केला. या कारवाईत वाहन व विदेशी मद्यसाठा असा सुमारे ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
शामू रज्जू गौड (३७, रा. कांजूर मार्ग, मुंबई), मोहम्मद सुलतान अश्लम अन्सारी (२६, रा. ता. पनवेल, जि. रायगड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाला आयशर ट्रकमधून अवैधरीत्या मद्याची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. पथकाने येवला येथील विंचूर चौफुलीवर सापळा रचला होता. तेथे ट्रक येताच संशयितांना पथकाची चाहूल लागली. त्यांनी ट्रक चांदोरीच्या दिशेने पळविला. पथकाने पाठलाग करत ट्रक चांदोरी चौफुलीवर अडविला. पथकाने ट्रकची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा आढळला. मद्यसाठा कागदी खोक्यांमागे दडविण्यात आला होता. पथकाने ट्रकसह मद्यसाठा असा ५२ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी येवला विभागाचे निरीक्षक विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, प्रवीण मंडलिक, अवधूत पाटील, विठ्ठल हाके, अमन तडवी, संतोष मुंडे, मुकेश निंबेकर यांनी बजावली.
The post Nashik : चांदोरीनजीक ५२ लाखांचा मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.