Site icon

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळीमुळे भाविकांचा वाढता ओघ

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळी पाडव्यापासून गर्दी उसळली असून, दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. दर्शनरांग बडा उदासीन आखाड्यापर्यंत पोहोचत आहे. पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यापासून ते रात्री आरतीनंतर दरवाजे बंद होईपर्यंत दिवसभर गर्दीचा ओघ कायम असतो.

दिवसभरात सकाळी 9 च्या सुमारास, दुपारी 12 च्या सुमारास आणि रात्री 8 च्या सुमारास नैवेद्य होतो. त्या दरम्यान गर्भगृहाचा दरवाजा बंद असतो. दरवाजा बंद असताना साधारणत: अर्धा तास व काही वेळेस त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी दर्शन बंद असते. भाविक रांगेत उभे राहतात व प्रतीक्षा करतात. देवस्थान ट्रस्टने सर्व पूजा, रात्रीची आरती यांची निश्चित वेळ जाहीर करावी. तसेच गर्भगृह बंद होण्याची व उघडण्याची वेळदेखील निश्चित करावी. भाविकांना त्याप्रमाणे दर्शन, आरती यांचा लाभ घेणे शक्य होईल. तसेच नैवेद्यादरम्यान दिवसभरात एकूण दीड तासांपेक्षा अधिक वेळ गर्भगृह बंद राहते. ती वेळ कमी केल्यास दर्शन घेणार्‍या भाविकांची संख्या अधिक होण्यास मदत होईल, अशी येथे आलेल्या भाविकांची अपेक्षा असल्याचे चर्चेतून लक्षात येते. दर्शनबारीत भाविकांना उन्हात उभे राहावे लागत आहे. देवस्थान ट्रस्टने आठ कोटी रुपये खर्च करत सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत दर्शनबारी उभारली आहे. मात्र, त्यापैकी केवळ अर्ध्या भागाचा वापर होतो, तर उर्वरित अर्धा भाग धूळ खात पडला आहे. भाविकांची रांग थेट बडा उदासीन आखाड्यापर्यंत उन्हात उभी राहात आहे. दरम्यान, पुढील काही दिवस शाळांना सुट्या असल्याने भाविकांचा ओघ राहणार असल्याने त्र्यंबक गजबजणार आहे.

दोनशे रुपये दर्शनातून अधिक उत्पन्न
दोनशे रुपये थेट दर्शनाची पावती घेण्यासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागते व त्यानंतर मंदिरात थेट दर्शनासाठी पुन्हा दोन तास थांबावे लागल्याने भाविकांचे वेळापत्रक बिघडले आहे. दिवाळी पाडवा झाला, तेव्हापासून दररोज सरासरी 10 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. किमान 5 हजार भाविक या रांगेतून दर्शन घेत आहेत. 200 रुपये दर्शनबारी देणगी पावतीमधला काही वेळ बंद ठेवतात. परंतु भाविकांना त्याची माहिती मिळत नाही. नेमके कधी 200 रुपये देणगी पावती सुरू होणार ? तसेच होईल की नाही? याबाबत शंका निरसन होत नसल्याने भाविक संभ—मावस्थेत सापडतात.

वाहतूक नियोजन कोलमडले
मंदिर चौकातील हायमास्ट बंद असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. व्यावसायिकांनी या चौकाला चौपाटीचे स्वरूप आणले आहे. रिंगरोडसह वाटेल तेथे वाहने उभी केल्याने वाहतुकीच्या नियोजनाचा फज्जा उडाला आहे. शहरात येणारे भाविक जमेल तिथे वाहन उभी करून दर्शनबारीत उभे राहतात. मात्र, देवदर्शन आटोपल्यानंतर वाहन नेमके कोणत्या पार्किंगला उभे केले, ते लक्षात येत नसल्याने विचारणा करत संपूर्ण गावाला फेरी मारतात.

हेही वाचा :

The post Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळीमुळे भाविकांचा वाढता ओघ appeared first on पुढारी.

Exit mobile version