Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर वज्रलेपनासाठी आजपासून आठ दिवस बंद

त्र्यंबकेश्वर वज्रलेप,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

पिंडीची झीज थांबवण्यासाठी वज्रलेपन करण्याकरिता येत्या 5 ते 12 जानेवारीपर्यंत त्र्यंबकेश्वरचे मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. आजपासून आठवडाभर मंदिर बंद राहणार असल्याने बुधवारी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खाते वज्रलेपनाचे काम करत आहे. बुधवारी रुद्रपूजा करण्यात आली. दुपारी पूजक डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रह्मवृंदाने पूजा केली. बुधवारी प्रदोष असल्याने विश्वशांतीसाठी पूजा करण्यात आली. आज गुरुवारपासून वज्रलेपनाचे काम सुरू होणार आहे. पिंडीची झीज थांबविण्यासाठी यापूर्वी 21 फेबुवारी 2006 मध्ये वज्रलेप करण्यात आला होता. परंतु त्याचा काही अंश 16 सप्टेंबर 2022 ला निघाला होता. मागच्या वेळेस केलेला वज्रलेप घाईगर्दीत करण्यात आला होता. रात्री वज्रलेपनानंतर किमान पुढचे तीन दिवस त्यावर जल अर्पण करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता. मात्र, आठ तासांच्या आत जलाभिषेक करण्यात आल्याने वज्रलेप टिकला नाही.

नवीन वज्रलेपनाच्या कामासाठी गुरुवारपासून भाविकांना मंदिरात प्रवेश बंद असेल. मात्र प्रात:काल, माध्यान्ह आणि रात्रीची अशा त्रिकाल पूजा त्याच सोबत प्रदोषपुष्प पूजा सुरू राहतील, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर वज्रलेपनासाठी आजपासून आठ दिवस बंद appeared first on पुढारी.