Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला

दिंडोरीचे नगरसेवक शिंदे यांच्या भेटीला,www.pudhari.news

दिंडोरी, (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असा दावा केला असताना एकीकडे शिवसेनेतील ठाणे, उल्हासनगरसह राज्यातील आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतांनाच दिंडोरी नगरपंचायतीच्या काही शिवसेना नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंडोरीचे नगरसेवक माझ्यासोबत असल्याचा दावा केल्याने दिंडोरी तालुका शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन देशमुख, विद्यमान नगरसेवक शिवसेना सुजित मुरकुटे, कॉंग्रेसचे नगरसेवक गणेश बोरस्ते, माजी नगरसेवक संतोष गांगोडे, नितीन धिंदळे यांच्यासह शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान या नगरसेवकांनी शहराच्या विकासकामांसंंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्याचा खुलासा केला आहे. काँग्रेस एक व शिवसेनेच्या काही नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचा सत्कार केला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाशिक व दिंडोरीचे नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा केल्याने आता तालुका शिवसेनेत फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र शिवसेनेचे गटनेते प्रदीप घोरपडे यांनी नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ दिंडोरी शहराच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते असा खुलासा केला आहे.

कालच शिवसेना दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुखपदी जयंत दिंडे यांची तर सुनील पाटील यांची जिल्हाप्रमुख म्हणून फेरनिवड झाल्यानंतर दिंडोरीचे नगरसेवक एकनाथ शिंदेच्या भेटीला गेल्याने आता पुढे काय घडामोडी घडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : दिंडोरीचे शिवसेनेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला appeared first on पुढारी.