
मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
किरकोळ अपघातात दुचाकीस्वाराला मारहाण करणार्या रिक्षाचालकाला कारावास, दंडाऐवजी झालेली शिक्षा मालेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. आरोपी युवकाला 21 दिवस मशिदीत पाच वेळची नमाज करण्यासह दोन वृक्षांची लागवड आणि संगोपनाचे आदेश देऊन सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश तेजवंतसिह संधू यांनी सोमवारी (दि.27) हा निकाल दिला.
समाजात गुन्हेगारीचे प्रमाण शक्य तो कमी व्हावे, गुन्हेगारास योग्य ते शासन करण्यासंदर्भात भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितेत रचना आहे. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन कायद्यातील तरतुदीनुसार न्यायाधीश हे निर्णय देत असतात. त्यातही अपवादात्मक परिस्थितीत न्यायालय शिक्षेपेक्षा सुधारण्याची संधीही देत असते, असेच प्रकरण मालेगावात घडले आहे.
शहरातील सोनापूर मशिद परिसरात 29 एप्रिल 2010 ला रिक्षा आणि दुचाकीत अपघात झाला होता. त्या वादातून रिक्षाचालक रऊफ खान याने तिघा मित्राच्या मदतीने दुचाकीस्वार मोहम्मद शरीफ अब्दूल मजीद शेख याला मारहाण केली होती. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार एस. एस. सूर्यवंशी यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायाधीश संधू यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे वकील जी. जी. पवार तर आरोपीच्या वतीने वकील एस. एस. निकम यांनी बाजू मांडली. साक्षी – पुराव्यावरुन रऊफ विरोधातील गुन्हा सिद्ध झाला. त्यावर न्यायाधीश संधू यांनी सुनावलेल्या शिक्षेने सर्वांनाच अंतर्मुख केले. दंड, कारावास असा कोणतीही शिक्षा न देता, न्यायाधीश संधू यांनी कलम 3 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत आरोपीला सुधारण्याची संधी दिली.
आरोपी हा मुस्लीम असल्याने त्याला 21 दिवस दररोज फजर, जोहर, असर, मगरीब व इशा अशी पाच वेळची नमाज अदा करण्यासह घटना घडली तेथीलच सोनापूर मशीद परिसरात दोन रोपांची लागवड करून संगोपन करण्यास सांगितले. त्यानुसार कृती होते की नाही, यास्तव कृषी अधिकार्यांची विशेष परिविधा अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. या शिक्षेविषयी सोनापूर मशिदीच्या इमाम यांनाही कळविले आहे.
हेही वाचा :
- ‘कलावती’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न
- पिंपरी : निकालासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा
- Kashmera Shah Kiss Video : मद्यधुंद अवस्थेत कश्मीराचे कृष्णा अभिषेकसोबत लिपलॉक
The post Nashik : दोषी रिक्षाचालकाला न्यायालयाने सुनावली अनोखी शिक्षा, 21 दिवस दररोज पाच वेळा नमाज पठण करण्याचे आदेश appeared first on पुढारी.