
नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा
शतकानुशतके चालत आलेली आदिवासी संस्कृती व रुढी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना काही निवडक लोक एका धर्माच्या प्रसाराच्या आडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या लोकांची चौकशी करून त्यांना मिळत असलेल्या आदिवासी योजनांचा लाभ बंद करावा, अशी मागणी तालुक्यातील कोठुळे गावातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांना कोठुळे व परिसरातील ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र मोरे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या गावात आदिवासी संस्कृती व रुढी-परंपरा जोपासत आलो आहोत. गावात एकही ख्रिश्चन व्यक्ती नसताना दोन अनधिकृत चर्च बांधून धर्मप्रचाराचे काम केले जात आहे. जे लोक ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत आहेत, ते आदिवासींसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभदेखील घेत आहेत. ते जर ख्रिस्ती धर्माचे असतील तर त्यांना मिळणाऱ्या कागदपत्रांवर तसा उल्लेख करावा. तसेच त्यांनी आदिवासींसाठी असलेल्या ज्या योजनांचा लाभ घेतला त्याची चौकशी करावी, अशी मागणी कोठुळे ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनादेखील निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
चर्चेतून प्रकरण मिटविले
दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. यावेळी वादविवाद होऊन चर्चेअंती माफी मागण्यात आल्याने मिटविण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी उपस्थित होते.
एकीकडे आदिवासी रुढी-परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे गावातीलच काही निवडक लोक तेढ निर्माण करत आहेत. तसेच त्यांच्या धर्माचे पत्रक घरांना चिटकवले. हे नक्की आदिवासी आहेत की ख्रिस्ती धर्माचे आहेत. ते ख्रिस्ती असतील तर तशी कागदोपत्री नोंद करून घ्यावी आणि त्यांना आदिवासी योजनांचा लाभ मिळू नये.
– मधुकर गायकवाड, ग्रामस्थ, कोठुळे
कोठुळे ग्रामस्थांची जी मागणी आहे, त्या मागणीची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल.
– प्रज्ञा भोकरे, तहसीलदार
हेही वाचा :
- Gold Ring : तीन हजार वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या अंगठीचा शोध
- Gram Panchayat Election Results : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा आज फैसला, वाचा निकाल एका क्लिकवर
- कोल्हापूर : त्यांचा जन्म अन् जगणंही उसाच्या फडात…
The post Nashik : धार्मिक प्रसाराविरोधात कोठुळे ग्रामस्थांची तक्रार, दोन अनधिकृत चर्च बांधल्याचा आक्षेप appeared first on पुढारी.