Site icon

Nashik : ध्येयासाठी विजिगीषू वृत्तीवर श्रद्धा हवी – संगीता धायगुडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल, तरीही ध्येय गाठण्याबद्दलच्या विजिगीषू वृत्तीवर ठाम श्रद्धा हवी. आपल्या प्रबळ, नितळ इच्छाशक्तीला नैसर्गिक प्रेरणाही साथ देतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांच्या याच प्रेरणेची कास धरल्याने माझी वाटचाल ध्येयपूर्तीच्या दिशेने झाली आणि मला हवे ते यश प्राप्त करता आले, असे प्रतिपादन राज्य प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी संगीता धायगुडे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनाच्या वतीने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम होते. कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यासनाच्या प्रमुख डॉ. चेतना कामळस्कर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाट्यशास्त्र विभागाचे सहयोगी सल्लागार सचिन शिंदे यांनी धायगुडे यांची मुलाखत घेतली.

कुलसचिव डॉ. देशमुख यांनी मनोगतात मुक्त विद्यापीठ शिक्षणापासून वंचित असलेल्या महिलांसाठी सातत्याने भरीव कामगिरी करत असल्याचे सांगितले. डॉ. निकम यांनी अध्यक्षीय मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही पैलू उलगडले. माधुरी खर्जुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. माधुरी देशपांडे यांनी परिचय करून दिला. प्रमोद पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता देव, अंजली शिंदे, भावना भऊरकर, डॉ. दयाराम पवार, दयानंद हत्तीअंबिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post Nashik : ध्येयासाठी विजिगीषू वृत्तीवर श्रद्धा हवी - संगीता धायगुडे appeared first on पुढारी.

Exit mobile version