Site icon

Nashik : नळजोडणी शुल्कात महापालिकेचा नाशिककरांना दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पाणीपट्टीची दरवाढ न करून नाशिककरांना सुखद दिलासा देणाऱ्या महापालिकेने नळजोडणी शुल्कात मात्र मोठा दणका दिला आहे. फेरूल जोडणी शुल्क, रोड डॅमेज शुल्क, अनामत रक्कम, फेरजोडणी शुल्क, रोड दुरुस्ती शुल्क, प्लम्बिंग लायसन्स तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा शुल्कात तब्बल पाच ते पंधरा पटीने वाढ करीत नाशिककरांच्या पाणीपट्टीत दरवाढ टळल्याच्या आनंदावर पाणी फेरले आहे. याशिवाय अनामत रक्कमही अडीच ते पाचपटीने वाढविल्याने महापालिकेची ही शक्कल नाशिककरांचा संताप अनावर करणारी ठरत आहे.

गुरुवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून, तो वसूल होत नसल्याने पालिकेची पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. वास्तविक पाणीपुरवठा योजना ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वावर चालवावी, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र पाणीपुवरठ्यावर होणारा खर्च वसूल करून पाणीपुरवठा विभाग स्वावलंबी करण्याची गरज असल्यानेच ही दरवाढ करणे आवश्यक असल्याचा दावा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्थायी समितीत करण्यात आल्याने, या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दरम्यान, नवीन दरांनुसार घरगुती अर्धा इंची नळजोडणीकरिता फेरूल जोडणी शुल्क ५० रुपयांऐवजी २५० रुपये, तर एक इंची नळजोडणीकरिता १०० ऐवजी ५०० रुपये आकारले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित आदेशांनुसार आता रोड डॅमेज फी आकारली जाणार आहे तर घरगुती अर्धा इंची नळजोडणीकरिता आकारल्या जाणाऱ्या २०० रुपये अनामत रकमेऐवजी आता ५०० रुपये तर एक इंची घरगुती नळजोडणीकरिता ८०० रुपयांऐवजी २,००० रुपये अनामत भरावी लागणार आहे. घरगुती अर्धा इंची फेरजोडणी शुल्कात कुठलीही वाढ नसली तरी एक इंची फेरनळजोडणी शुल्कापोटी २५० ऐवजी ५०० रुपये मोजावे लागतील. बिगर घरगुती नळजोडणीकरिता फेरूल जोडणी शुल्क दहापट, अनामत रकमेत पाचपट तर फेरजोडणी शुल्कात दुप्पट ते चारपट वाढ करण्यात आली आहे.

नळजोडणीच्या आकारानुसार ही रक्कम बदलत जाणार आहे. व्यावसायिक बांधकांमाकरिता फेरूल जोडणी शुल्क १५ पट आकारले जाणार आहे. अर्धा इंची नळजोडणीकरिता ५० रुपये दर आकारले जात होते. आता ७५० रुपये मोजावे लागणार आहेत. एक इंची व्यावसायिक नळजोडणीसाठी १०० रुपयांऐवजी आता १,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक बांधकामांची अर्धा इंचीकरिता अनामत रक्कम ८०० वरून २,०००, एक इंचीकरिता ३,२०० वरून १० हजार रुपये करण्यात आली आहे.

प्लम्बिंग लायसन्ससाठी चौपट रक्कम

नवीन प्लम्बिंग लायसन्सकरिता आता २५० ऐवजी १ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. परवाना फी ५० रुपयांवरून ३ हजार, नूतनीकरण फी ५० वरून १ हजार, विलंब फी ५० वरून १ हजार करण्यात आली आहे. तर नवीन नळजोडणी अर्जाची किंमतही ५ वरून १० रुपये करण्यात आली आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा महागला

१ हजार लिटर पाण्यासाठी आता १०० ऐवजी ३०० रुपये, ४ हजार लिटरसाठी २७५ ऐवजी ६०० रुपये, ५ हजार लिटरसाठी ९०० रुपये, ८ हजार लिटर पाण्यासाठी ४५० ऐवजी १,२०० रुपये तर व्यावसायिक कार्यक्रमांसाठी ८ हजार लिटर पाण्यासाठी २,५०० रुपये मोजावे लागणार

हेही वाचा : 

The post Nashik : नळजोडणी शुल्कात महापालिकेचा नाशिककरांना दणका appeared first on पुढारी.

Exit mobile version