Nashik : नववर्षारंभी निफाडला पारा पुन्हा आठ अंशांवर

थंडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवीन वर्षाच्या प्रारंभीच निफाडमध्ये तापमानाचा पारा ७.८ अंशांपर्यंत खाली घसरला असून, तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्येही गारठ्यात वाढ झाली आहे.

अवघ्या २४ तासांमध्ये निफाडच्या पाऱ्यात २.६ अंशांची घट झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात घसरण झाली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे तालुक्यात गारठा वाढला असून, थंडीने निफाडवासीय हैराण झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे. तसेच दुभत्या जनावरांची काळजी घेण्यात बळीराजा मग्न आहे. वाढत्या थंडीचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटवून धूरफवारणी केली जात आहे.

नाशिक शहरातील थंडीचा कडाका वाढला असून, पारा १० अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतात दंग असलेले शहरवासीय थंडीने गारठून गेले आहेत. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी होत आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या अन्य भागांतही पहाटे व रात्रीच्या वेळी थंड वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावर होत आहे. शेतीपिकांना थंडीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. येत्या काळात थंडीच्या कडाक्यात भर पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : नववर्षारंभी निफाडला पारा पुन्हा आठ अंशांवर appeared first on पुढारी.