Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच ‘ढील’, संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय हरित लावादाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी, शहर व परिसरात त्याचा सर्रास वापर केल्याचे मकरसंक्रांतीच्या दिवशीदेखील दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मात्र, ऐन मंकरसंक्रांतीच्यादिवशी नायलॉन मांजा वापराला ढील दिल्याचे दिसून आले.

नवीन वर्षाचा पहिलाच सण असलेल्या मकरसंक्रांतीचा शहर व परिसरात उत्साह दिसून आला. तिळगूळ वाटण्याबरोबरच पतंग उडविण्याचा आनंददेखील यावेळी तरुणाईकडून घेण्यात आला. त्यामुळे आकाशात दिवसभर पतंग काटाकाटीचे खेळ रंगले. या खेळात आपल्या पतंगाचा धागा सहजपणे कापता न यावा याकरिता अनेकांनी नायलॉन मांजा वापरल्याचेही दिसून आले. अत्यंत जीवघेण्या पद्धतीने हा सर्व प्रकार सुरू असतानादेखील पोलिस प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. पाकीट, गट्टू, पक्का धागा या सांकेतिक शब्दांचा वापर करून हा सर्व प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे काही विक्रेत्यांनी ही संधी साधून चढ्या दराने नायलॉन मांजा विकल्याचेही दिसून आले.

दरम्यान, मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला छुप्या पद्धतीने पंचवटी, जुने नाशिक, भद्रकाली, सातपूर, सिडको, पवननगरसह उपनगरातील काही भागांत नायलॉन मांजाची विक्री केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये मूळ विक्रेता ग्राहकाच्या समोर येत नसून, मध्यस्थ आणि ग्राहक यांच्यातच व्यवहार होत झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या छुप्या व्यवहाराबाबत प्रशासन अनभिज्ञ राहिल्याने संक्रांतीच्या दिवशी त्याचा सर्रासपणे वापर केल्याचे दिसून आले.

पक्ष्यांवर संक्रांत

नायलॉन मांजाचा वापर केल्याने, रस्त्यांसह झाडांवर तो अडकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अडकलेल्या नायलॉन मांजामुळे पक्ष्यांवर संक्रांत येण्याची शक्यता पक्षिप्रेमींकडून वर्तविली जात आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात या मांजामुळे पक्षी मरण पावतात. यंदाही मांजा मोठ्या प्रमाणात वापरल्याने, त्याचे परिणाम पक्ष्यांना भोगावे लागण्याची चिंता पक्षिप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

‘बारातारी’चा मोठा वापर

अगदी नायलॉन मांजाप्रमाणे असलेल्या ‘बारातारी’चाही मोठा वापर संक्रांतीच्या दिवशी करण्यात आला. बारा पदरांमुळे पतंगबाजीसाठी हा धागा चांगला असल्याचे सांगितले जाते. हा मांजा सर्वांना देण्याऐवजी जी व्यक्ती नायलॉनची मागणी करेल, त्याच व्यक्तीला हा पर्यायी मांजा दिला जात आहे. या मांजाचा पूर्ण गट्टू एक हजार २०० रुपयांपासून दुकानांत उपलब्ध आहे. नायलॉनप्रमाणेच असणारा हा मांजादेखील जिवावर बेतणारा आहे.

हेही वाचा :

The post Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच 'ढील', संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर appeared first on पुढारी.