Nashik : नाशिकच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य

धूळीचे साम्राज्य नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. बुधवार (दि. ८) पासून अवकाळी पावसाने उघडीप घेतली आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यालगत मातीचे थर साचले असून, वाहनांमुळे मातीचे रूपांतर धुळीत होत आहे. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र शहरातील सर्व रस्त्यांवर बघावयास मिळत आहे.

अवकाळी पावसाने रस्त्यावर ठिकठिकाणी मातीचे छोटे-छोटे ढिगारे तयार झाले होते. त्यातच शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल साचला होता. पावसाने उघडीप घेतल्यानंतर रस्त्यावर धावणार्‍या वाहनांमुळे शहरात धुळीचे लोट उठत आहेत. ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने सतत उठणार्‍या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यालगतच्या माती आणि कचमुळे वाहनांचे किरकोळ अपघात होत आहेत.

धुळीमुळे रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. धुळीतून मार्गस्थ व्हावे लागत असल्याने दमा, खोकला, सर्दी आणि श्वासनांच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. धुळीच्या माध्यमातून बारीक-बारीक मातीचे कण थेट डोळ्यांमध्ये जात असल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे डोळ्यांचे विकार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या धुळीच्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी मनपा प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

मनपाकडून माती हटविण्याचे काम

शहरासह उपनगरांमधील रस्त्यावर अवकाळी पावसाने माती साचली आहे. पादचारी नागरिकांसह वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी मनपाकडून रस्त्यावरील मातीचे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हवेच्या प्रेशर मशीन्सच्या सहायाने रस्त्यावरील माती आणि कच बाजूला केली जात आहे.

हेही वाचा :

The post Nashik : नाशिकच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य appeared first on पुढारी.