Nashik : नाशिकमध्ये कुटुंबाची मान्यता मात्र जातपंचायतीच्या दबावामुळे विवाहसोहळ्याला ‘लव्ह जिहाद’चा रंग

<p>नाशिक : हिंदू आणि मुस्लिम समाजात होणाऱ्या एका लग्नसोहळ्याची पत्रिका सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकमध्ये पार पडणारा हा सोहळा खरं तर सगळ्यांसाठीच एक आदर्श ठरणार होता, मात्र या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आल्याने तसेच काही धार्मिक कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे हे लग्नच रद्द झाले आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार जातपंचायतीच्या दबावामुळे झाल्याचा आरोप करत याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे.&nbsp;<br />&nbsp; &nbsp;<br />नाशिक मधील एका हिंदू कुटुंबातील तरुणीचे मुस्लिम समाजाच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी नोंदणी पद्धतीने या दोघांनी लग्नही केले होते. विशेष म्हणजे संबंधित तरुणी ही दिव्यांग असतानाही मुलाने कुठल्याही अटीशिवाय स्व-इच्छेने हे लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने वधू कुटुंबिय देखील खूश होते. नोंदणी पद्धतीने विवाह तर झाला मात्र मुलीचे वडील एक नामांकित सराफ व्यावसायिक असल्याने हा सोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही धर्माच्या कुटुंबातील सदस्यांची लग्नाबाबत झालेली बैठक यशस्वी होताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन हा सोहळा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत 18 जुलै 2021 रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्याचे ठरले.</p>