
मनोज कावळे (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
बिपीनच्या दोन्ही मारेकऱ्यांना न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्याने तूर्त तरी न्याय मिळाला. आमचा एकुलता एक मुलगा आमच्यापासून हिरावणाऱ्यांना नियतीने फाशीची शिक्षा दिली. आता त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा मयत बिपीनचे वडील गुलाब आणि आई भारती बाफना यांनी व्यक्त केली.
ओझर परिसरात भुसार धान्य व्यापारी म्हणून परिचित असलेले गुलाब बाफना यांचा बिपीन हा एकुलता मुलगा होता. बिपीन हा नाशिक येथील खासगी महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमा वर्गात शिकत होता. शिक्षणासोबतच त्याला डान्सचे वेड होते. एक उत्कृष्ट डान्सर म्हणून त्याची ओझर व परिसराला ओळख होती. आपण भले आणि आपले काम भले, या व्याख्येत बसणाऱ्या बाफना परिवारातील बिपीनचे अपहरण झाल्यानंतर ओझरकरांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तब्बल आठ दिवस नाशिकचे पोलिस आणि बाफना परिवार बिपीनचा शोध घेत असतानाच अखेर या अपहरणाचा शेवट बिपीपनच्या दुर्दैवी हत्येने होत १४ जून २०१३ ला त्याचा मृतदेह आडगावनजीकच्या विंचूर गवळी शिवारात सापडला आणि एकच खळबळ उडाली होती.
तब्बल साडेनऊ वर्षे चाललेल्या या खटल्यात दोन मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जाट या दोन्ही आरोपींना त्यांच्या कुकर्माची शिक्षा दिली. परंतु या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अपेक्षा बाफना परिवाराने व्यक्त केली आहे. आमचा न्यायालयावर व न्यायदेवतेवर विश्वास असून आम्हाला न्याय मिळाला. आता अंमलबजावणी व्हावी, हीच आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना मयत बिपीनची आई भारती बाफना यांनी व्यक्त केली.
परिवार अजूनही मानसिक धक्क्यातच
बिपीन बाफना याच्या अपहरण व हत्या या घटनेला तब्बल साडेनऊ वर्षांचा काळ लोटला. आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा झाली. परंतु बाफना परिवार अजूनही या दुर्दैवी घटनेतून सावरलेला नाही. बिपीनची आई भारती बाफना आणि वडील गुलाब बाफना हे शून्यात नजर लावून बसलेले होते. आपला एकुलता मुलगा तर गेलाय आता काय… असा दुर्दैवी प्रसंग शत्रूवरदेखील येऊ नये. आता फक्त फाशीच्या शिक्षेची अंमलबजाणी तातडीने व्हावी, इतकी अपेक्षा व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
हेही वाचा :
- Artemis 3 : २०२५ मध्ये पहिली महिला जाणार चंद्रावर; नासाच्या सहप्रशासक कॅथरीन लुएडर्स यांची माहिती
- रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ठप्प! येरवड्यातील डांबर प्लांट बंदचा परिणाम
- रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ठप्प! येरवड्यातील डांबर प्लांट बंदचा परिणाम
The post Nashik : न्याय तर मिळाला, आता फक्त..; बाफना परिवाराला अश्रू अनावर appeared first on पुढारी.