Site icon

Nashik : पिंजर्‍यातील मत्स्यव्यवसायासाठी सामंजस्य करार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी बांधवांच्या उत्पन्नवाढीसाठी आदिवासी विकास विभागांच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. पिंजर्‍या मत्स्यव्यवसायातून आदिवासींसाठी उपजीविकेचा पर्याय निर्माण करण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे. दोन आदिवासी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांसोबतचा या योजनेचा सामंजस्य करार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या योजनेमुळे सुमारे 1000 आदिवासी कुटुंबांच्या रोजगार निर्मितीस मदत होणार आहे.

मत्स्यव्यवसायासाठी केंद्र शासनच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या माध्यमातून ‘पिंजर्‍यातील मत्स्यव्यवसाय’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत मत्स्यव्यवसायासाठी लागणारी साधनसामग्री – त्यात विविध प्रकारचे जाळे, लाइफ जॅकेट, मशीन बोट, फायबर बोट, मत्स्यविक्रीसाठी अद्ययावत सुविधा असलेले वाहन, मत्स्यपेटी, अल्युमिनिअम प्लेट्स, मत्स्य बीज निर्मिती केंद्र, माशांसाठी लागणारे खाद्य, पिंजरे, मासे साठविण्यासाठी कोल्ड स्टोअरेज व आदिवासी सभासदांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आदींचा समावेश करण्यात आला आहे. योजनेसाठी ‘मत्स्य सखी’ची मदत घेण्यात येणार आहे. शबरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्यामार्फत दोन मंजूर प्रकल्पांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारानुसार आवलमाता भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला 106.41 लाख, तर एकलव्य आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेला 44.20 लाख निधी मिळणार आहे. सामंजस्य कराराप्रसंगी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका बनसोड यांच्यासह पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महामंडळाचे महाव्यवस्थापक जालिंदर आभाळे, प्रशांत ब—ाह्मणकर, ‘आवलमाता’चे अध्यक्ष प्रवीण शिरसाठ, ‘वीर एकलव्य’चे अध्यक्ष मोतीलाल भिल आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik : पिंजर्‍यातील मत्स्यव्यवसायासाठी सामंजस्य करार appeared first on पुढारी.

Exit mobile version