Nashik : पिंपळकोठे ग्रामपंचायतीत कर्मचार्‍याची आत्महत्या

आत्महत्या

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळकोठे येथे ग्रामपंचायत कर्मचार्‍याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.20) सकाळी उघडकीस आली. नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश गांगुर्डे हे बुधवारी (दि.20) सकाळी कार्यालयात आले असता संगणक कक्षात पाणीपुरवठा कर्मचारी समाधान निंबा पाटील (37) हे छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

गांगुर्डे यांनी तत्काळ पोलिसपाटील शीला भामरे यांना माहिती दिली. भामरे यांच्या खबरीवरून पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवला. पंचनामा करून मृतदेह नामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे खळबळ माजली असून, पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. वडील निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर ते ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गावापासून तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात ते वास्तव्याला होते. आठवड्यातून तीन दिवस रात्रीचा वीजपुरवठा असताना जलकुंभ भरण्यासाठी ते ग्रामपंचायत कार्यालयातच मुक्कामाला थांबत होते, अशी माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे मुक्कामाला असतानाच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा कयास आहे. परंतु, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

याबाबत जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमागील कारणाचा शोध घेण्यात येत असून, ग्रामस्थ, सहकर्मचारी आणि आप्तांच्या चौकशीतून काय निष्कर्ष येतो, याकडे लक्ष लागून असेल.

हेही वाचा :

The post Nashik : पिंपळकोठे ग्रामपंचायतीत कर्मचार्‍याची आत्महत्या appeared first on पुढारी.