Nashik : पीएफआय सदस्यांच्या कोठडीत 14 दिवस वाढ

पोलिस कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने सप्टेंबरमध्ये मालेगावसह पुणे, बीड, कोल्हापूर येथून पकडलेल्या ‘पॉप्युलर फ—ंट ऑफ इंडिया’च्या पाच पदाधिकार्‍यांच्या कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (दि.3) न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. या संशयितांचा जर्मन बेकरी व हैदराबाद येथील बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपींसोबत संबंध असल्याचा संशय दहशतवादविरोधी पथकास आहे. या संशयितांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचेही समोर आले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा व ईडीच्या निर्देशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी धाडी टाकून 22 सप्टेंबरला देशभरातून ‘पॉप्युलर फ—ंट ऑफ इंडिया’च्या पदाधिकार्‍यांची धरपकड केली आहे. त्यानुसार नाशिक दहशतवादविरोधी पथकानेही मालेगावमधून मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी याच्यासह पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख, रझी अहमद खान, बीडमधून वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख, कोल्हापूरमधून मौला नसीसाब मुल्ला या पाच जणांना अटक केली आहे. त्यांना विशेष न्यायालयाने 3 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली होती. चौकशीदरम्यान, दहशतवादविरोधी पथकाने संशयितांच्या बँक खात्यांसह मोबाइलची पाहणी केली. त्यात संशयितांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले असून, त्यांचे एकमेकांसोबत झालेले संवादही संशयास्पद असल्याचा पथकाचा दावा आहे. अटकेत असलेल्या काही संशयितांनी आखाती देशांमध्येही काही दिवस वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. जर्मन बेकरी व हैदराबाद येथील बॉम्बस्फोटप्रकरणी फरार असलेल्या आरोपींसोबतही या संशयितांचा संपर्क असल्याचा संशय पथकास आहे. त्यादृष्टीने पथकास काही पुरावे मिळाल्याचे समजते.

संशयितांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी (दि.3) विशेष न्यायालय व्ही. एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. तपासासाठी न्यायालयाने संशयितांच्या कोठडीत पुन्हा वाढ केली असून, त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. पथकाने जप्त केलेले मोबाइल व लॅपटॉप परत द्यावे, अशी मागणी संशयितांनी न्यायालयात केली होती, मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.

 

The post Nashik : पीएफआय सदस्यांच्या कोठडीत 14 दिवस वाढ appeared first on पुढारी.