Site icon

Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत येत्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करा यासह अनेक मागण्यांसाठी देशभरातील आशा व गटप्रवर्तक येत्या २८ मार्चला दिल्लीत जंतरमंतर येथे देशव्यापी मोर्चा काढणार आहे.

आयटकच्या अखिल भारतीय आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने मोठ्या संख्येने दिल्ली आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले, राज्य सरचिटणीस कॉ. सुमन पुजारी यांनी केले आहे.

देशातील गरीब, दुर्लक्षित, गरजू जनतेला सहज साध्य परवडण्याजोगी कार्यक्षम, उत्तरदायी व विश्वासार्ह आरोग्यसेवा पुरविण्यासाठी २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले. सध्या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुमारे आठ लाख आशा स्वयंसेविका व सुमारे ४० हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सध्या देशस्तरावर आशा स्वयंसेविकांना माहिती व अहवालाचे अचूक संकलन हेण्यासाठीची मासिक सभा, प्राथमिक आरोग्य स्तरावरील मासिक सभा या मंजूर कामाकरिता दरमहा २००० रुपये मोबदला देण्यात येतो. याव्यतिरिक्त आशा स्वयंसेविकांना विविध कामांसाठी कामावर आधारित मोबदला दिला जातो. यात प्रवास भत्त्याचा समावेश करून केंद्र शासनाकडून दरमहा ८,४७५ रुपये मोबदला मिळतो. कामाच्या तुलनेत हा भत्ता अतिशय कमी आहे.

ग्लोबल लीडर पुरस्काराने सन्मान

गटप्रवर्तकांचे व आशा स्वयंसेविकांचे काम हे कायमस्वरूपी व आवश्यक काम आहे. त्यांच्यामुळे देशातील माता व बालमृत्यूचा दर कमी झाला आहे. त्या सर्वसाधारण जनतेपर्यंत सर्वसमावेशक आरोग्यसेवा पोहोचविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्या संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देतात. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना कोविड १९ च्या काळात केलेल्या कामाची दखल जागतिक आरोग्य संस्थेने घेतली. ग्लोबल लीडर अवाॅर्ड २०२२ साठी भारतातल्या आशा स्वयंसेविकांची निवड करण्यात आली होती.

या आहेत मागण्या

१) गटप्रवर्तकांना तृतीयश्रेणी तर आशा स्वयंसेविकांना चतुर्थश्रेणी देऊन कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा

२) २०१८ पासून गटप्रवर्तक व आशाच्या मोबदल्यात वाढ झाली नाही. कोरोनायोद्धयांना किमान वेतन देऊन सन्मान करावा

३) गटप्रवर्तकांना दरमहा २४ हजार रुपये किमान वेतन व प्रवास भत्ता देण्यात यावा

४) स्वयंसेविकांना दरमहा २४ हजार रुपये देण्याची तरतूद येत्या पुरवणी अर्थसंकल्पात करावी

हेही वाचा : 

 

The post Nashik : प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचा दिल्लीत मोर्चा appeared first on पुढारी.

Exit mobile version