Nashik : फेब्रुवारीमध्येच उन्हाचे चटके, नाशिककर हैराण

उन्हाचे चटके,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

फेब्रुवारी महिन्यातच सूर्य कोपला असून, नाशिक शहरात सोमवारी (दि.२०) किमान तापमानाचा पारा ३६.३ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके बसत आहेत. हवामानातील या बदलामुळे नाशिककर हैराण झाले आहेत.

राज्यभरातून थंडीने काढता पाय घेतल्यानंतर उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. गुजरातच्या कच्छपासून ते मध्य प्रदेशातील मैदानी भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील तापमानावर होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून नाशिक शहरातील किमान तापमानाचा पारा ३३ अंशांपलीकडे जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे ऐन फेब्रुवारी महिन्यात नाशिककरांना तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे.

गेल्या वर्षी राज्यभरात पाऊस चांगला झाला असून, नाशिकमध्येही त्याने सरासरी ओलांडली. त्यामुळे यंदाच्या वर्षी उन्हाच्या कडाक्यातून काहीअंशी सुटका होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, तो अंदाज फाेल ठरला असून, फेब्रुवारीतच उन्हाळ्याला प्रारंभ झाला. येत्या ४८ तासांत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीसह मुंबईत किमान तापमानात वाढ होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नाशिकमध्येही उष्ण लहरींचा परिणाम जाणविण्याची शक्यता आहे. दुपारी ११ ते ४ या वेळेत उन्हाचा जोर अधिक असणार आहे. त्यामुळे या कालावधीत घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकचे किमान तापमान

दिनांक अंश

१३ फेब्रुवारी 30.9

१४ फेब्रुवारी 31.7

१५ फेब्रुवारी 33.5

१६ फेब्रुवारी 34.1

१७ फेब्रुवारी 34.5

१८ फेब्रुवारी 33.4

१९ फेब्रुवारी 34.2

२० फेब्रुवारी 36.3

हेही वाचा : 

The post Nashik : फेब्रुवारीमध्येच उन्हाचे चटके, नाशिककर हैराण appeared first on पुढारी.