Site icon

Nashik : बागलाणला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी, आराई, ब्राह्मणगाव परिसरात मंगळवारी (दि. २३) सायंकाळी आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसात ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले.

जुनी शेमळी येथील गोरख बाबाजी शेलार यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून संसार उघड्यावर आला, तर राजेंद्र खैरनार यांची गाय मृत्युमुखी पडली. याव्यतिरिक्तही राहती घरे, कांदा चाळी व जनावरांचे शेड यांची पत्रे उडून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. विशेषत्वाने अतिशय वेगवान वादळी वाऱ्याने जुनी शेमळी, आराई, ब्राह्मणगाव परिसरात मोठी हानी केली. ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून कोसळले. तसेच विजेचे पोलही उन्मळून पडले. सटाणा-मालेगाव रस्त्यावर आराई ते ब्राह्मणगाव दरम्यान चार ते पाच ठिकाणी मोठे वृक्ष कोसळले.

त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. याबाबत समजताच पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी घटनास्थळी दाखल होत बांधकाम विभाग व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी मदतकार्य सुरू केले. यामुळे काही वेळानंतर वाहतूक सुरळीत झाली. सोमवारीही (दि.२२) सायंकाळच्या सुमारास ठेंगोडा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : बागलाणला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Exit mobile version