Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत

बिबट्याचा धुमाकूळ

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

परिसरात मागील पंधरवड्यात बिबट्या जेरबंद केलेला असतानाच लगतच्या भगूर व दारणा परिसरात बिबट्यांचा वावर पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भगूरपासून 4 किमी अंतरावरील लोहशिंगवे गावाच्या गराडी नाल्याजवळ वाहतुकीच्या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास दोन बिबट्यांचा मुक्त संचार दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

दारणाकाठच्या पट्ट्यातील नानेगाव, शेवगेदारणा, संसरी, भगूर, दोनवाडे, राहुरी, लहवित, वंजारवाडी आदी गावांमध्ये सातत्याने बिबट्याचे वास्तव्य आढळत आहे. नदीकाठचा परिसर असल्यामुळे पाण्याची व लपण्याची सोय शिवाय लगत लष्कराचे जंगल असल्याने बिबट्यासाठी भक्ष्य मोठ्या प्रमाणात असून, काही वर्षांपूर्वी लष्करी यंत्रणेनेच जंगल वाचवण्यासाठी बिबटे या परिसरात सोडले होते. त्यामुळे आजही बिबट्यांचा वावर येथे मुक्तपणे होताना आढळत आहे. शनिवारी (दि. 29) सायंकाळी 7 च्या सुमारास वंजारवाडी रस्त्यावर लोहशिंगवे गावालगत गराडी नाल्याजवळ दोन बिबटे दिसल्याने वाहनधारकासह शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या भात लावणी सुरू असून ग्रामीण भागात लोडशेडिंग असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात मोटार सुरू-बंद करण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

या परिसरात वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी बाजीराव पाटोळे, किशोर सोनवणे, ज्ञानेश्वर जैन, माजी सरपंच संतोष जुंद्रे, त्र्यंबकराव जुंद्रे, कैलास पाटोळे, गंगाराम पाटोळे, भाऊसाहेब जाधव, माजी सैनिक शिवाजी डांगे, भाऊसाहेब जुंद्रे, कमलाकर पाटोळे, रतन पाटोळे, प्रकाश जुंद्रे आदींनी केली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत appeared first on पुढारी.