
मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
येथील लोकोशेडजवळ धावत्या रेल्वेचा भीषण अपघात झाल्याचा कंट्रोल रूममधून संदेश येताच रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडून त्यांची तारांबळ उडाली.
सुरक्षा, वाणिज्य, ऑपरेटिंग, इंजिनिअरिंग, सिग्नल, इलेक्ट्रिशियन, आरोग्य, एनडीआरएफचे पथक, रेल्वे पोलिस, आरपीएफ, अग्निशमन दल, उपजिल्हा रुग्णालय आणि रेल्वेचे डॉक्टर, ॲम्ब्युलन्ससोबत वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी हातातले काम सोडून घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेचा धोक्याचा सायरन सतत वाजत असल्याचे पाहून मोठा अपघात झाला म्हणून मदतीसाठी नागरिकही मोठ्या संख्येने अपघातस्थळी दाखल झाले होते. मात्र, रेल्वेचा कोणताही अपघात झाला नसून जर घटना घडली तर यंत्रणा किती सक्षम आहे आणि अधिकारी, कर्मचारी किती वेळात घटनास्थळी पोहोचतात हे जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मॉकड्रिल घेण्यात आल्याचे समजताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. मनमाडला प्रथमच असा मॉकड्रिल घेण्यात आला.
रेल्वे प्रशासन सर्वांत जास्त भर प्रवाशांच्या सुरक्षेवर देते. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. जर धावत्या गाडीचा अपघात झाला आणि डब्यात प्रवासी अडकले तर त्यांना कसे वाचविता येईल, यासाठी मनमाडच्या लोकोशेडजवळ गाडीचा अपघात होऊन डबे एकमेकांवर चढले आणि त्यात काही प्रवासी अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागांतील कर्मचारी आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. खिडकीचे गज कापून कर्मचारी आत गेले आणि त्यांनी डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. एनडीआरएफच्या पथकातील काही कर्मचारी थेट डब्याच्या छतावर जाऊन त्यांनी छताचा पत्रा कापून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
इकडे जखमी प्रवाशांसाठी घटनास्थळी डॉक्टरची टीम तैनात होती. त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना तातडीने ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये पाठविले. सर्वच अधिकारी आणि कर्मचारी प्रवाशांना वाचविण्यासाठी झटत होते. अखेर डब्यात अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप वाचविण्यात यश आले. अत्यंत थरारक अशा या मॉकड्रिलसाठी रेल्वेचे अधिकारी शैलेंद्र कुमार, मोहित मांडलेकर, ए. के. पाठक, महेश प्रसाद, आर. एल. प्यासे, श्री. महाजन, पी. डी. सोनवणे, विशाल भाकुने, आर. एल. मीणा आदींसह रेल्वेचे इतर अधिकारी, कर्मचारी, रेल्वे आणि शहर पोलिस, पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा :
- Pakistani Local : ‘आम्हाला मोदींसारखे पंतप्रधान हवेत,’ हताश पाकिस्तानी तरुणाची अल्लाहकडे याचना, व्हिडिओ व्हायरल
- Naresh Goyal : जेट एअरवेजच्या गोयल दाम्पत्याला मुंबई हायकोर्टाचा दिलासा; ईडीला धक्का
- Congress leader Pawan Khera: काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक, विमानातून उतरवले
The post Nashik : मनमाडला रेल्वे अपघाताचा थरार, पहिल्यांदाच घडलं... appeared first on पुढारी.