Nashik : मालेगावला यंत्रमाग कार्यालय फोडून 27 लाखांची रोकड पळवली

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सरदारनगरमध्ये अज्ञाताने यंत्रमाग कारखान्याच्या कार्यालयात घरफोडी करुन तब्बल 27 लाख 160 रुपयांची रोकड पळविली. पैशांच्या बंडलमुळे अवजड झालेली बॅग त्याने खांद्यावर ठेवून पायी चालत पळ काढला. शुक्रवार, (दि.21) जुलैच्या मध्यरात्री ही चोरी झाली असून हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही फुटेच्या आधारे संशयिताची ओळख पटली असून पथक त्याच्या मागावर आहे.

गोल्डननगर भागातील रहिवासी अन्वर अहमद शकील अहमद यांचा यंत्रमाग कारखाना आहे, तर सरदारनगरमध्ये त्यांचे सिल्वर किंग नावाचे कार्यालय आहे. शुक्रवारी रात्री ते बंद असल्याची संधी साधत अज्ञाताने या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. केबिनच्या काचा फोडून टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 27 लाखांची रोकड एका मोठ्या पिशवीत भरून तो बाहेर पडला. मात्र नोटांच्या वजनामुळे पिशवीचे ओझे जास्त झाल्याने त्याने ती पिशवी खांद्यावर उचलून घेत पायी चालत चालत तो निघून गेला. शनिवारी सकाळी मालक अन्वर हे कार्यालयात गेले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. याप्रकरणी अन्वर अहमद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटली असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे. चोरटा हा माहितीगार असल्याचा संशय आहे.

हेही वाचा :

The post Nashik : मालेगावला यंत्रमाग कार्यालय फोडून 27 लाखांची रोकड पळवली appeared first on पुढारी.