Nashik : ‘मिशन भगीरथ प्रयास’ द्वारे दुष्काळी गावे पाणीदार होतील : दादा भुसे

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेचा ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात पाणीदार होतील, असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा. तसेच या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाच्या निधीसोबतच १० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेतर्फे अयोजित ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रम कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. माणिक कोकाटे, डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते.

ना. भुसे म्हणाले, या उपक्रमातून पिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच मनरेगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होणार असून, दुष्काळ काळात होणारे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबणार आहे. लोकांनी स्वत:च्या गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. लोकसहभागातून काम करताना गावातील ज्येष्ठ मंडळींचे अनुभव व मार्गदर्शन पूरक ठरणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा निश्चित करण्यात यावी. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी समर्पित भावनेतून कोणताही शासनाचा निधी न घेता केलेल्या कार्यातून राजस्थानमधील गावांचे चित्र बदलले. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन नाशिक जिल्ह्यास लाभल्यास निश्चितच मिशन भगीरथ प्रयास उपक्रम यशस्वी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत २०० गावांतून ७०५ कामांचे नियोजन करण्यात आले असून, या कामांसाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करण्यात येणार असल्याचेही भुसे म्हणाले.

भूगर्भातील पाणीसाठा वाढावा : राजेंद्र सिंह

शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यााठी भूगर्भाचा अभ्यास, संशोधन करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे. योग्य स्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावांतील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकर्सची संख्या कमी होऊन मिशन भगीरथ प्रयास यशस्वी होईल, असा विश्वास जलतज्‍ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

The post Nashik : 'मिशन भगीरथ प्रयास' द्वारे दुष्काळी गावे पाणीदार होतील : दादा भुसे appeared first on पुढारी.