Nashik : रस्त्यांची धूळधाण, नाशिककर हैराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाने उघडीप दिल्याने शहर पुन्हा एकदा धुळीत हरवले आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून रस्त्यांवर धूळच-धूळ पसरत आहे. ही धूळ दुचाकीचालकांच्या नाका-तोंडात आणि डोळ्यांत जात असल्याने नाशिककरांसह जिल्ह्याच्या बाहेरील वाहनधारक हैराण झाले आहेत. महापालिकेने दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करून रस्ते स्वच्छ करावे, अशी मागणी होत आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, एकीकडे दिलासा मिळालेला असताना शहरवासीयांसमोर अनेक समस्यांनी घेरले आहे. शहर-परिसरातील बहुतांश रस्त्यांवरील खड्डे जैसे-थेच आहेत. त्यातच मुख्य बाजारपेठांमध्ये स्मार्ट सिटी कामांच्या नावाखाली रस्ते खणून ठेवले आहेत. हे संकट कमी होती की काय? आता प्रचंड धुळीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. प्रमुख रस्त्यांवरून मोठ्या वाहनांमुळे धुळीचे लोळ उठतात. परिणामी, अशावेळी तेथून मार्गक्रमण करताना दुचाकीस्वारांचा कस लागतो आहे. तर सुरक्षिततेच्या कारणास्तव पादचार्‍यांनादेखील तोंडाला रूमाल बांधून जावे लागते. सततच्या पावसामुळे यापूर्वीच नाशिककरांना सर्दी-पडसे-ताप अशा विविध आजारांना सामोरे जावे लागले. त्यातच आता धुळीमुळे श्वसनाचे व अन्य आजार जडण्याची भीती असल्याने नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरामधून महापालिका प्रशासनाविरोधात तीव— संताप व्यक्त केला जातोय. तसेच अंधाराकडून तेजोमयाकडे घेऊन जाणार्‍या दिवाळी सणापूर्वी तातडीने उपाययोजना राबवित रस्त्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.

वाहतूक कोंडी पाचवीला…
पावसाने उघडीप दिल्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाने पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांची आणि विविध कामे हाती घेतली आहेत. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी खोदाई करून ठेवली असून, ही सर्व कामे संथगतीने सुरू आहेत. परिणामी अवघ्या शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे घरातून कामानिमित्त बाहेर पडणार्‍या नाशिककरांच्या पाचवीला जणू काही ही कोंडी पुजली गेलेली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : रस्त्यांची धूळधाण, नाशिककर हैराण appeared first on पुढारी.