Nashik : रस्त्यात थांबलेल्या आयशरला कंटेनर धडकल्याने मायलेकी ठार

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

आयशरमध्ये तांदळाचा भुसा घेऊन घोटी येथून जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मायलेकी ठार झाल्या असून, आणखी तिघे जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी कन्नमवार पूल येथील उड्डाणपुलावर हा अपघात झाला.

अपघातात तरणम अफजल शेख (वय ४) आणि नथिसा अफजल शेख (वय २६) या दोघा मायलेकींचा मृत्यू झाला, तर वाहनचालक अफजल रोशनअली शेख, साबिना शेख (५) व जेनेद शेख (१ वर्षे) असे तिघे जण जखमी झाले. हे सर्व जण घोटी येथील रहिवासी आहेत.
इगतपुरीतील घोटीत राहणारे अफजल शेख मंगळवारी आयशर वाहनातून (एमएच ०४ एफयू ०६७१) तांदळाचा भुसा घेऊन धुळ्याला जात होते. त्यांच्या समवेत पत्नी नथिसा, मुलगी तरणम व जुनेद असे पाच जण होते. सकाळी कन्नमवार पूल उड्डाणपुलावर शेख यांनी चारचाकी थांबवली व पती-पत्नी खाली उतरून गाडीला मागील बाजूने दोरी बांधत होते. त्यांची मुले वाहनात बसलेले होते. त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या कंटनेरने (एमएच ४३ बीपी १०३३) रस्त्यात उभ्या वाहनाला धडक दिली. त्यात नथिसा चिरडल्या गेल्या, तर पती रस्त्यावर पडले.

वाहनात बसलेली तरणम ही बालिका खाली पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर मार लागला, तर सबिना व जुनेद हे जखमी झाले. या अपघातात कंटनेर चालक मोहम्मद ताहीर शेख वडाळा हा जखमी झाला आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

The post Nashik : रस्त्यात थांबलेल्या आयशरला कंटेनर धडकल्याने मायलेकी ठार appeared first on पुढारी.