Nashik : रस्त्यावरील धूळ अन् बारीक खडीमुळे नाशिककर हैराण

नाशिक : धूळ, खडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रस्त्यावरील खड्ड्यांनी अतोनात छळ केल्यानंतर आता धूळ अन् बारीक खडीमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे रस्त्यावरील धूळ अन् बारीक खडी त्रासदायक ठरत आहे. या धुळीमुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवत असून, दम्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मनपाने मोजक्याच रस्त्यांवर साफसफाई मोहीम राबविली असली तरी, शहरातील सर्वच रस्त्यावरील धूळ अन् खडीची साफसफाई करण्यास मनपाने तत्परता दाखवावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी मनपाने ठेकेदारांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत रस्त्यांचे कामे पूर्ण केली होती. सर्वत्र चकाचक रस्ते असल्याने नाशिककरांनीही समाधान व्यक्त केले होते. मात्र, नाशिककरांचे हे समाधान औटघटकेचे ठरले. कारण पाऊस सुरू होताच, ठेकेदारांचे पितळ उघडे पडले. नव्या-कोर्‍या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने, या रस्त्यांवरून नाशिककरांना वाट शोधणेही अवघड झाले. केवळ खड्डेच नव्हे तर हे रस्ते चिखलात अद़ृश्य झाल्याने या रस्त्यांवरून वाट शोधणे अवघड होऊ लागले. खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीचा त्रास सुरू झाला, तर वाहनांचाही खुळखुळा झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने, रस्त्यांवरील चिखलाची धूळ झाली असून, खड्ड्यातील खडी अपघाताला निमंत्रण देत आहे. धुळीमुळे अनेकांना डोळ्याच्या समस्या वाढल्या असून, खडीमुळे वाहने चालविणे अवघड होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मनपा प्रशासन याबाबत फारसे गंभीर नसल्याने, नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारण धूळ अन् खडीमुळे अपघातांच्या घटना वाढल्या असून, जीवितहानीचे प्रकारही समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन मनपाने शहरातील मोजक्याच रस्त्यांवर साफसफाई मोहीम सुरू केली असून, इतर रस्त्यांबाबत मनपा अजूनही फारशी गंभीर नसल्याचे चित्र आहे.

मोजक्याच रस्त्यांवर साफसफाई
शहरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, या रस्त्यांवर आता धूळ अन् खडीचा नागरिकांना प्रचंड त्रास भेडसावत आहे. मात्र, अशातही मनपाने मोजक्याच रस्त्यांवर साफसफाई मोहीम सुरू केली असून, इतर रस्त्यांवर साफसफाई करण्याची तत्परता मनपा प्रशासन दाखविणार काय? असा सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

The post Nashik : रस्त्यावरील धूळ अन् बारीक खडीमुळे नाशिककर हैराण appeared first on पुढारी.