वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
वणी व परिसरात जोरदार पावसामुळे दोन ठिकाणी पुलाचे अर्धे भाग वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वणी व परिसरात पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी पुलांची पडझड झाली आहे. वणी – कळवण – मुळाणेमार्गे रस्त्यावरील संगमनेर शिवारात सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या पुलाचा अर्धा भाग वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना कळविले आहे. परंतु, त्यांच्याकडून, आपण लवकरच पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. अहिवंतवाडी-जिरवाडे रस्त्यावरील पुलाचा अर्ध्याहून अधिक भाग वाहून गेला आहे. त्यामुळे तेथेही वाहतूक विस्कळीत झाली आहे. नवीन पुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांच्या समस्येत भर पडत आहे. पूल वाहून जाण्याचे प्रकार दरवर्षी होतात. परंतु, त्याकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते.
पूल वाहून जाणार्या ठिकाणी दोन्ही बाजूने तातडीने बॅरिकेडिंग करणे गरजेचे आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाची जबाबदारी महसूल विभाग व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची असते. मात्र, हे अधिकारी स्थानिक नसल्याने आपत्कालीन वेळेत ग्रामस्थांना त्यांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शासकीय यंत्रणेने दखल घेत कोणताही अपघात घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा :
- सांगवी-वाघवस्ती रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता!
- पिंपरी : शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या रांगा
- पन्नाशीनंतरचे आर्थिक नियोजन
The post Nashik : वणीत जोरदार पाऊस ; दोन पुलांचे अर्धे भाग गेले वाहून appeared first on पुढारी.