Nashik : शहरात ट्रिपल सीट फिरणारे रडारवर

ट्रिपल सिट नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह टवाळखोर सर्वाधिक ट्रिपल सीट फिरत असल्याचे आढळत आहे. वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईमुळे गत वर्षीच्या तुलनेने यंदाच्या कारवाईत तिपटीने वाढ झाली आहे.

वाहनाच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर शहर पोलिस नियमित कारवाई करीत आहेत. बेशिस्त चालकांवर हजारो रुपयांचा दंड, गुन्हे दाखल केले जात असल्याने सायलेन्सरमध्ये फेरफार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईदरम्यान, ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाईचा धडाका वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. गतवर्षभरात १ हजार ८६५ वाहनचालकांवर ट्रिपल सीट वाहने चालविल्याबद्दल कारवाई झाली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत ४९१ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई झाली होती, तर यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान, एक हजार ३३१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईसाठी शहरात नाकाबंदी केली जात आहे.

तसेच विनाहेल्मेट वाहनचालकांवरही कारवाई सुरू असून, त्यामुळे बेशिस्त चालकांना आर्थिक झळ बसत आहे. काही चालकांची वाहनेही जप्त केली आहेत, तर काही वाहने प्रादेशिक परिवहन विभागाकडे चाचणीसाठी पाठविण्यात आली आहेत. पोलिसांच्या पाहणीत तरुण-तरुणीही ट्रिपल सीट वाहने चालवित आहेत. शैक्षणिक संस्था, उद्याने, प्रशस्त रस्ते या ठिकाणी सर्वाधिक ट्रिपल सीट वाहने आढळून येत असल्याचेही निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : शहरात ट्रिपल सीट फिरणारे रडारवर appeared first on पुढारी.