Nashik : शहर पोलिसांना सराईत गुन्हेगारांकडून आव्हान

मटका अड्डा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात महिनाभरापासून शहर पोलिसांकडून अवैध धंदेचालकांवर कारवाई केली जात आहेत. त्यात गुन्हे शाखा, पोलिस आयुक्तांनी तयार केलेली पथके व स्थानिक पोलिस ठाण्यांमार्फत संशयितांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, आत्तापर्यंत पोलिसांनी किरकोळ अवैध मद्यविक्री व साठा करणाऱ्यांसह जुगाऱ्यांवर कारवाई केली आहे. अवैध धंद्यांमधील सराईतांवर कारवाई होत नसल्याने संख्यात्मक कारवाईवर भर दिल्याचे चित्र असून, दर्जात्मक कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, नागरिकांना सुरक्षितता मिळावी, पोलिसांची दृश्यमानता वाढवण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे अंमली पदार्थविरोधी, गुंडा प्रतिबंधक, खंडणीविरोधी, दरोडा व शस्त्रविरोधी पथके नेमली असून, त्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह १५ ते २० पोलिस अंमलदारही पथकांना दिली आहेत. त्यांच्या जोडीला स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा यांचेही पथक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानुसार शहरात पोलिसांनी कारवाईंचा धडाका लावत दररोज किमान पाच गुन्हे दाखल करीत जुगारी, अवैध मद्यसाठा व विक्री करणारे, शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. त्यात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मात्र, पोलिसांच्या या कारवाईत आत्तापर्यंत किरकोळ मद्यविक्रेते, जुगाऱ्यांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यांची संख्या ५० च्या आसपास गेली असली तरी जुन्या जुगार अड्ड्यांसह मोठ्या प्रमाणात मद्यविक्री व साठा करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. छोट्यांवर कारवाई करीत मोठ्यांना अप्रत्यक्षरीत्या मदत केली जात असल्याचीही चर्चा रंगली आहे. आत्तापर्यंत ज्या मद्यविक्री व साठा करणाऱ्यांवर कारवाई केली आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त केलेला नाही. त्यामुळे मोठ्या विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.

पोलिस ठाण्यांचे दुर्लक्ष

शहरात गुन्हे शाखा व पोलिस आयुक्तांनी नेमलेल्या पथकांमार्फत कारवाई केली जात आहे. त्यात पीटा, अवैध धंदेचालक, जुगाऱ्यांवरही कारवाई केली आहे. ज्या ठिकाणी कारवाई झाल्या आहेत ते ठिकाण व्यावसायिक संकुल किंवा निवासी वस्तीजवळ असल्याने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती नव्हती की त्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, असा प्रश्न उपस्थित आहे. स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच अवैध धंदेचालक फोफावल्याचे बोलले जात आहे.

संख्यात्मक कारवाईवर जोर

अवैध मद्यसाठा व विक्री करणाऱ्यांसह जुगारी, शस्त्र बागळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईचा आढावा घेतल्यानंतर संख्यात्मक दृष्ट्या कारवाई जास्त दिसत असली तरी त्यात मद्यविक्रीतील सराईत किंवा मोठे जुगारी आढळून आलेले नाही. त्यामुळे किरकोळ प्रमाणात अवैध मद्यविक्री किंवा जुगार खेळणाऱ्यांवर या कारवाईचा धाक निर्माण झाला, असे वाटत असले तरी या अवैध धंद्यांमध्ये बस्तान मांडून बसलेले आहेत त्यांना अद्याप कारवाईची झळ पोहोचलेली नाही. त्यामुळे किरकोळ धंदे बंद होत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदाच मोठ्या जुगार अड्डे व धंदेचालकांना होत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : शहर पोलिसांना सराईत गुन्हेगारांकडून आव्हान appeared first on पुढारी.