Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा – डॉ. भारती पवार

भारती पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आजच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभात जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचा बोलबाला आहे. ही बाब सकारात्मक आहे. मात्र, नाशिकचा लौकिक हा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर परदेशातही वाढावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. नवे शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे असून, त्याची जनजागृती करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी सभापती मनीषा पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन आनंद पिंगळे, शिक्षणाधिकारी बी. डी. कमोज, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, हिरामण झिरवाळ आदी उपस्थित होते.

ना. डॉ. पवार म्हणाल्या की, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना जो रोडमॅप तयार करण्यात आला आहे, त्यामध्ये शैक्षणिक धोरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या या धोरणाबाबतची फारशी जनजागृती झाली नसली तरी, त्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असणार आहे. नरहरी झिरवाळ म्हणाले की, ‘कोविड काळात शिक्षकांनी प्रबोधनाचे काम केले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा याकरिता पुरस्कारार्थींच्या संख्येत वाढ करायला हवी. शिक्षण वाघिणीचे दूध असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याहीपेक्षा ते जहाल आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता काळानुसार बदल करायला हवेत. संगणकीय युगात संगणक आणि शिक्षकांची तलवार आणि ढाल आहे. शिक्षकांनी गावकर्‍यांनी आपल्या बाजूने करून घेत शैक्षणिक सुविधा साधल्यास, लोकप्रतिनिधी आपसूकच सर्व व्यवस्था करण्यासाठी पुढे येतील. अशा प्रकारचा बदल प्रत्येक शिक्षकाने स्वीकारायला हवा, असेही ते म्हणाले. याप्रसंगी शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील बदल यावर मार्गदर्शन केले.

दरम्यान, याप्रसंगी 2021-22 या वर्षातील तब्बल 30 गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शाल, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी प्रमोद आहिरे, देवीदास मोरे, नलिनी अहिरे, जयदीप गायकवाड या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. डी. कमोज यांनी केले. सुभाष राऊत व नेहा शिरूरे यांनी सूत्रसंचालन केले.

या शिक्षकांचा झाला सन्मान
(शैक्षणिक वर्ष 2020-21)
शशिकांत काशीनाथ शिंदे, मंजुषा बबन लोखंडे, स्वाती केशव शेवाळे, नितीन कौतिक देवरे, कैलास यादव शिंदे, देवीदास मिला मोरे, सर्जेराव रावजी देसले, संदीप कडू हिरे, जयंत रामचंद्र जाधव, नीलेश नारायणराव शितोळे, प्रमोद वसंत अहिरे, विजय तुकाराम निरगुडे, हरेराम मोहन गायकवाड, रवींद्र गंगाराम लहारे, संदीप जगन्नाथ वारुळे.

शैक्षणिक वर्ष 2021-22
दिनेश रघुनाथ सोनवणे, हेमंत शांताराम बधान, वृषाली भिला देसले, जयदीप नामदेव गायकवाड, जयवंत हरिश्चंद्र पवार, माधुरी केवलराम पाटील, सुनील त्रिंबक पवार, नलिनी बन्सीलाल आहिरे, चेतन दत्तात्रेय अहिरराव, राजेंद्र नारायण पाटील, देवदत्त हरी चौधरी, ज्योती रामनाथ कदम, मोतीराम भगवान भोये, अनिल रमेश महाजन, उज्ज्वला अरुण सोनवणे.

दिंडोरीचा बोलबाला
गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभात दिंडोरी तालुक्याचा चांगलाच बोलबाला दिसून आला. दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्याचबरोबर पुरस्कारार्थी शिक्षकांमध्येही दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांचा आकडा मोठा होता. अशात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी तालुका आघाडीवर असल्याचे सांगताना नाशिक शिक्षणात महाराष्ट्रात अव्वल असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

माझा माइक अन् मीच ऐक
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी खास आपल्या शैलीत भाषण करीत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. त्यांनी शिक्षक, गावकरी आणि शाळा यांची अनेक उदाहरणे दिले. दिंडोरी तालुक्याचा पुरस्कार सोहळ्यात बोलबाला राहिल्याने, त्यांनी त्यावरूनही तालुक्यातील शाळा आणि शिक्षकांचे किस्से सांगितले. जऊळके येथील शाळेबाबत मी तुम्हाला नंतर विस्ताराने सांगेल नाहीतर ‘माझा माइक अन् मीच ऐक’ असे व्हायला नको, असे म्हणून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.

हेही वाचा :

The post Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा - डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.