Nashik : श्रावणासाठी त्र्यंबक नगर परिषद सज्ज

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
नगर परिषद श्रावण महिन्यासाठी सज्ज झाली असून, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, मुख्याधिकारी संजय जाधव यासह नगरसेवक आणि सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. स्वच्छता आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी शहरातील मंदिर परिसर, नारायण नागबली केंद्र, अहिल्या गोदावरी संगम, कुशावर्त परिसर व प्रमुख मार्ग 24 तास स्वच्छता करण्यासाठी पुरेसा सफाई कर्मचारीवर्ग तीन पाळींमध्ये कार्यरत राहणार आहे. प्रत्येकी तीन कर्मचारी याप्रमाणे सहा संचांची जादा नेमणूक करण्यात आली. जागोजागी आवश्यक ती जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे.

भाविकांकरिता प्रदक्षिणा मार्गावर माहितीदर्शक फलक लावण्याचे काम हाती घेतले आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. मंदिर प्रवेशद्वाराजवळील व कुशावर्त तीर्थ व प्रमुख मार्गावरील अतिक्रमित दुकाने हटविण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची 15 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक जागी दोन हजार लिटर क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आलेल्या आहेत. अग्निशमन वाहन कर्मचारी तैनात करण्यात येत आहे. गणपत बारी, जव्हार रोड, बसस्थानक व प्रयागतीर्थ येथे फिरत्या शौचालयांची व्यवस्था झाली आहे. श्रावण महिन्यात पूर्णपणे प्लास्टिक बंदीकरिता स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.

मंदिर पहाटे पाचलाच उघडणार श्रावण महिन्यात मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत खुले राहील. प्रत्येक श्रावण सोमवारी दर्शनासाठी वेळ पहाटे 4 ते रात्री 9 अशी आहे. स्थानिक भक्त, गावकरी यांना दर्शनवेळ मंदिर उघडल्यापासून ते सकाळी 11 पर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत राहील. गावकर्‍यांना दर्शनास येताना स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक राहील आणि त्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिल जाईल. तसेच दर्शनासाठी गावकर्‍यांना मंदिराच्या उत्तर दरवाजा म्हणजेच जाळी गेटने प्रवेश दिला जाईल. शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना पूर्वनियोजित लेखी प्रोटोकॉल असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे व्हीआयपी दर्शन दिले जाणार नाही. धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजा व देणगी दर्शनरांग उत्तर दरवाजा येथून राहील.

देवस्थानचे दर्शनाचे नियोजन
भाविकांना पूर्व दरवाजा येथे वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकाच वेळेस सोळा हजार भाविक याठिकाणी दर्शनासाठी उभे राहू शकतात. दर्शन रांगेत ज्येष्ठ मंडळींना बसण्यासाठी व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आलेला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : श्रावणासाठी त्र्यंबक नगर परिषद सज्ज appeared first on पुढारी.