Nashik : सिन्नरजवळ तिहेरी अपघात, पाच जण जखमी

अपघात,www.pudhari.news

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर – शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत शनिवार (दि.१३) पहाटे सहा वाजेदरम्यान खाजगी आराम बस, आयशर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात पाच जण जखमी झाले आहे. अपघातात आराम बस व टाटा पंच कार या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

सिन्नर -शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत असणारा उड्डाणपूल उतरत असताना एकेरी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी गतिरोधक आहे. मात्र सुसाट असणाऱ्या वाहनचालकांच्या गतिरोधक व एकेरी वाहतूक सुरू होत असल्याचे लक्षात येत नसल्याने सदर ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात. या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याचे फलक नसल्याचे निदर्शनास आले आहे.

गुजरात येथून खाजगी आराम बस क्र. Gj 14 v 6633  साईंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना शिर्डी येथे घेऊन जात होते. दरम्यान सिन्नर -शिर्डी महामार्गवर शहापूर गावालगत अचानक एकेरी वाहतूक सुरू झाल्याने बस चालकाचा ताबा सुटला अन पूढे गतिरोधकमुळे स्लो झालेल्या टाटा पंच या कारला पाठीमागून धडक दिली. सुदैवाने धडकेत कार बाजूला गेली. त्यानंतर बसने  आयशर ट्रकलाही पाठीमागून धडक दिली. धडकेत खाजगी बस चालकच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून बसमधील अन्य चार जण किरकोळ जखमी आहेत.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक दुर्गेश शिंदे तसेच स्थानिकांनी अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान  घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नितीन काकड, गंभीरे यांनी तात्काळ धाव घेत घटनेची माहिती घेतली. बस चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघाताचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : सिन्नरजवळ तिहेरी अपघात, पाच जण जखमी appeared first on पुढारी.