Nashik : ‘होपिंग फ्लाईट’ ने नाशिक देशातील ३० शहरांना होणार कनेक्ट

विमानसेवा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इंडिगो विमान कंपनीने १ जूनपासून आपल्या विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणा केल्यानंतर त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असून, ‘होपिंग फ्लाइट’च्या माध्यमातून नाशिक देशातील ३० प्रमुख शहरांना कनेक्ट होणार आहे. कंपनीमार्फत १ जूनपासून नाशिकहून अहमदाबाद, गोवा, इंदूर, हैद्राबाद, नागपूर या प्रमुख शहरांना सेवा सुरू केले जाणार आहे.

नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या ‘इंडिगो’कडून गोवा, नागपूर व अहमदाबादसाठी रोज तर ‘स्पाइसजेट’कडून नवी दिल्लीसाठी आठवड्यातून तीनदा सेवा दिली जाते. या सर्व फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘इंडिगो’ने सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक जूनपासून इंदूर, हैदराबाद व अहमदाबादसह गोवा, नागपूर विमान सेवा सुरू केली जाणार आहे. अहमदाबादसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रोज सरासरी ९० टक्क्यांहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. यामुळे या मार्गावर आणखी एक विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने घेतला आहे. नवी दिल्ली व बेंगळुरूसाठी सेवा सुरू करण्याचाही ‘इंडिगो’चा विचार असल्याचे समजते. इंडिगोची नवीदिल्ली विमानसेवा सुरू झाल्यानंतर नाशिकच्या प्रवाशांना नवी दिल्लीसाठी स्पाइसजेट व इंडिगो असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच ‘स्पाइसजेट’नेही लवकरच हैदराबाद सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या इंडिगो कंपनीचे विमान दुपारी ३.४५ ला नाशिक येथून निघून सायंकाळी ५.२५ वाजता अहमदाबादला पोहोचते. आता नव्याने सुरू होणारे विमान सकाळी ८.३० ला अहमदाबाद येथून निघेल. ते ९.३० ला नाशिकला पोहोचेल. ते परतीच्या दिशेने ९.४५ ला उड्डाण करील व सकाळी १०.४५ ला अहमदाबाद येथे पोहोचेल. भाविकांसह व्यापारी, उद्योजक, पर्यटकांमुळे अहमदाबाद सेवेला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले जाते.

या शहरांना कनेक्ट

अहमदाबाद, गोवा, इंदूर, हैद्राबाद, अहमदाबाद, नागपूर या प्रमुख शहरांना तर होपिंग फ्लाइटच्या माध्यमातून अमृतसर, बंगळूरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईमतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकाता, कोझीकाेड, लखनऊ, मंगळुरू, रायपूर, राजमाहेंदरी, रांची, तिरुअंनतपूरम, तिरुपती, उदयपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, विजयवाडा या शहरांना कनेक्ट होता येणार आहे.

१ जूनपासून सुरू होणाऱ्या इंडिगो विमानसेवेच्या माध्यमातून होपिंग फ्लाइटने नाशिक देशातील बहुतांश शहरांना जोडले जाणार आहे. नाशिककच्यादृष्टीने ही बाब नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

– मनीष रावल, अध्यक्ष, आयमा एव्हिएशन कमिटी.

हेही वाचा :

The post Nashik : 'होपिंग फ्लाईट' ने नाशिक देशातील ३० शहरांना होणार कनेक्ट appeared first on पुढारी.