Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई…

हेल्मेटसक्ती नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात हेल्मेट परिधान न केल्याने रस्त्यावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर चालू वर्षी हेल्मेट न वापरल्यामुळे रस्त्यावरील अपघातामध्ये ८३ मोटार सायकल स्वारांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. त्याच प्रमाणे गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले असल्याचे चित्र समोर आले आहे.  त्यामुळे येत्या 1 डिसेंबरपासून वाहतूक नियमभंग करणा-या विरुध्द मोटार वाहन कायदा अधिनियम १९८८ व कलम १२९/९७७ अन्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी स्वत:च्या सुरक्षितेसाठी व कायदेशीर बाबींचे पालन करण्यासाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.

अशी आहेत कारणे…

बरेच दुचाकीस्वार अपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यामुळे गंभीररित्या जखमी होतात, रस्त्यावर डोके आपटून फुटल्यामुळे मृत्यू येतो. त्यामुळे हेल्मेट वापरल्यामुळे दुर्देवाने अपघात झालाच तर डोक्याला व चेह-याला गंभीर इजा होत नाही. तसेच जीवीत हानी देखील होत नाही हे सर्व वाहनधारकांनाच चांगलेच माहिती आहेच.

काय म्हणतो कायदा…

दुचाकी वाहन चालवित असतांना हेल्मेटचा वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम १९८८, कलम १२९/१७७ नुसार बंधनकारक आहे. हेल्मेट न वापरता दुचाकी वाहन चालविल्यास रु.५००/- दंडाची तरतूद आहे. कायदेशीर बाबी असूनही हेल्मेट वापरणे हे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे.

शहरात राबवले प्रायोगिक तत्वे..

नाशिक शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग-३ वर गस्त वाढविली असता प्राणांतिक अपघातांमध्ये ब-यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावर वाढविण्यात आलेल्या गस्तीमुळे काही वाहन चालकांचा जीव वाचलेला आहे. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. त्या-त्यावेळी अपघाताच्या संख्येमध्ये, प्राणांतिक अपघातामध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आलेले आहे.

पोलिस विभागाचे आवाहन…

नाशिक शहर कायदा व सुव्यवस्थेचे स्वंयस्फूर्तीने पालन करत असून त्यामुळे सुजान नागरिकांना सक्ती करण्याची आवश्यकता पडत नाही. तथापी दुचाकीस्वारांचे होणारे अपघात व त्यामध्ये होणारी प्राणहानी, गंभीर जखमा व त्यामुळे येणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणा-यांविरुध्द पोलीसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते. नाशिक शहरातील सर्व दुचाकीस्वारांना त्यांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरुन आपले दुचाकी वाहन चालवावे व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post Nashik : १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्‍ती, अन्यथा होणार कायदेशीर कारवाई... appeared first on पुढारी.