Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी…

चापडगाव सिन्नर विद्यार्थी मोर्चा,www.pudhari.news

नाशिक, (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील चापडगाव आश्रमशाळेचे विद्यार्थी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर उतरून थेट नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर मोर्चा घेऊन निघाले होते. तथापि, या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी मनधरणी करत माघारी फिरविल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी (दि. 29) सकाळी हा प्रकार घडला.

दापूर-चापडगाव रस्त्यालगत चापडगाव शिवारात संत तुकाराम महाराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून, येथे वसतिगृहात विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आहे. सदर आश्रमशाळेत 436 मुले व मुली निवासी शिक्षण घेत आहेत. पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग असून, दीडशे मुली आहेत. या मुलींच्या वसतिगृहासाठी गेल्या तीन वर्षांपासून महिला अधीक्षिका नाही. संस्थेने त्यापूर्वी कार्यरत अधीक्षकेला निलंबित केल्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परिणामी कंत्राटी पद्धतीने महिला अधीक्षकपदाची जबाबदारी घ्यायला कुणी तयार होत नाही. शाळेतील शिक्षिका आळीपाळीने एक दिवस मुक्कामी थांबून मुलींची काळजी घेतात, असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, वसतिगृहात गैरसोयीचा सामना करावा लागतो. मुलींच्या वसतिगृहासाठी महिला अधीक्षिका नसल्याने अडचण होते. जेवणाचा दर्जा राखला जात नाही. शिक्षकांकडून मुलींना स्वयंपाक करायला सांगितला जातो. शिपायाकडून विद्यार्थ्यांना शाळेचा परिसर स्वच्छ करायला सांगितला जातो. क्रीडा व संगणक शिक्षणाची परवड सुरू असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. आंघोळीला गरम पाणी मिळत नाही. रात्रीच्या वेळी मुला-मुलींची सुरक्षा रामभरोसे असल्याने विद्यार्थ्यांनी आज सकाळी नाशिक येथील आदिवासी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. आश्रमशाळा प्रशासनाचा निषेध करत हे विद्यार्थी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर पोहोचल्यानंतर शिक्षकांनी धावत पळत येत या विद्यार्थ्यांची मनधरणी करून पुन्हा शाळेत नेले.

समस्येवर तोडगा काढणार : मुख्याध्यापक पालवे

मुख्याध्यापक सोपान पालवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत तोडगा काढण्यात येईल. तसेच तक्रारींचे संस्थास्तरावर निवारण करण्यात येईल, असे सांगितले.

सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांकडून तातडीने दखल

दरम्यान, सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने चापडगाव गाठले. आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली. विद्यार्थ्यांना दिले जाणाऱ्या काही वस्तूंचे परिमाण योग्य नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे जाणवले. आश्रमशाळा प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी... appeared first on पुढारी.