Nashik : अश्वसौंदर्य स्पर्धेत येवल्याची ‘अश्वराणी’ एक नंबर

येवल्याची अश्वराणी,www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या अश्वसौंदर्य स्पर्धेत सहभागी ३०० पेक्षा अधिक अश्वांमध्ये येवल्यातील ‘अश्वराणी’ने पहिला नंबर पटकावला आहे. यापूर्वी आपण अनेक सौंदर्य स्पर्धेबाबत ऐकले, वाचले असेल. मात्र, चेतक फेस्टिव्हलमध्ये होणारी अश्वसौंदर्य स्पर्धा ही भारतातील एकमेव अश्वसौंदर्य स्पर्धा असून, अश्वशौकिनांसाठी ही मोठी पर्वणी असते.

सारंगखेडा हे शहादा तालुक्यातील (जि. नंदुरबार) गाव असून, येथे १८ व्या शतकापासून दरवर्षी घोड्यांच्या बाजार भरतो. यानिमित्ताने येथे चेतक फेस्टिव्हलमध्ये होणारी अश्वसौंदर्य स्पर्धा प्रसिद्ध आहे. देखणे आणि रुबाबदार एकाहून एक सरस अश्व या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेत विजयी अश्वांना भविष्यात लाखो आणि कोट्यवधींच्या बोली लागत असतात. नेहमीच्या सौंदर्य स्पर्धेसाठी जे मापदंड असतात तेच अश्वसौंदर्य स्पर्धेसाठी असतात. अश्वसौंदर्य स्पर्धेत अश्वाची चाल, त्याच्या शरीराची ठेवण, उंची रुबाबदारपणा यासह त्यातील सर्वच गुणांचे मूल्यमापन करून चेतक फेस्टिव्हलमध्ये सर्वांत सुंदर अश्वांची निवड केली जाते. आणि यावर्षीचा अश्वसुंदरी चा पहिल्या नंबरचा बहुमान येवला शहरातील प्रसिद्ध अश्वप्रेमी सम्राट जाधव यांच्या अश्वराणी या 32 महिने वयाच्या मादी अश्वाला मिळाला आहे. या घोडीची आई कोयल ही पंजाबचे प्रसिद्ध राजकीय नेते सुखबिरसिंग बादल यांच्या बादल स्टड फार्म मधील असून, घोडीचा पिता देवराज हा पंजाबमधील रणाया येथील आहे. सम्राट जाधव यांना मागेल त्या किमतीत अश्वराणीला खरेदीदारांनी आपला रस दाखवला. देशात पहिल्यांदाच सारंगखेडा येथे डे, नाइट स्पर्धा होत असल्याने अश्वप्रेमींसाठी ही मोठी उत्साहाची बाब ठरली होती.

मालकांना होतो कोट्यवधींचा लाभ

सारंगखेड्यातील अश्वबाजारामध्ये दाखल झालेले महागडे अश्व हे त्यांचे मालक विक्री करत नसतात. तर केवळ अश्वप्रदर्शनासाठी हे अश्व सारंगखेडा येथे दाखल होत असतात. या अश्वांच्या ब्लडलाइन आणि इतर गोष्टींमुळे ते अश्व प्रजननासाठी वापरले जातात. त्यातून या अश्वाच्या मालकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा होत असतो.

हेही वाचा :

The post Nashik : अश्वसौंदर्य स्पर्धेत येवल्याची 'अश्वराणी' एक नंबर appeared first on पुढारी.