Nashik : आंतरजातीय विवाह करणाऱ्यासांठी शेल्टर होम उभारावे, जातपंचायत मूठमाती अभियानाची मागणी

Marriage

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र सरकारने हरियाना राज्याप्रमाणे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात सेफ शेल्टर होम (सुरक्षित निवारागृह) बांधावे, अशी मागणी जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र सरकारने नुकतीच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहासंदर्भात एक समन्वय समिती नेमली आहे. महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्य अशा विवाहाची माहिती आई-वडिलांना देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. परंतु जातपंचायत व ऑनर किलिंगच्या घटना हाताळताना असे लक्षात येते की, केवळ आई वडीलच नव्हे तर संपूर्ण जात व जातपंचायतीचा अशा विवाहांना टोकाचा विरोध असतो. त्यांच्यात समन्वय होणे आवश्यक असल्याचे चांदगुडे म्हणाले.

सेफ शेल्टर होममध्ये जीवाला धोका असणाऱ्यांना सहा महिने मोफत राहता यावे. त्यांच्या जेवणाची मोफत सोय व्हावी. असे निवारागृह प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस ठाण्याच्या आवारात असावीत. त्याला पोलीस संरक्षण असावे. जोडपी व कुटुंबीय व इतरांचे समुपदेशन पोलीस बंदोबस्तात व्हावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. मागील वर्षी न्यायमूर्ती थुल यांच्या आयोगासमोरही अशी मागणी अंनिसने केली होती. चांदगुडे यांनी हरियानातील सेफ होमला भेट देऊन त्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर ही मागणी केली आहे. हरियानातील जातपंचायतीचा जोडप्यांना होणार त्रास व ऑनर किलिंगचे प्रमाण यामुळे कमी झालेले आहे. त्याप्रकारे महाराष्ट्रात सेफ होम झाल्यास जातपंचायतच्या क्रूर घटना कमी होतील, असे चांदगुडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : आंतरजातीय विवाह करणाऱ्यासांठी शेल्टर होम उभारावे, जातपंचायत मूठमाती अभियानाची मागणी appeared first on पुढारी.