Nashik : आजाराशी झुंज देताना सिन्नरच्या जवानाचे निधन

सिन्नरचे जवान गणेश जगताप यांचे निधन, www.pudhari.news

सिन्नर : जि. नाशिक पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथील भूमिपुत्र, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान गणेश संपत जगताप (29) यांचे बुधवारी (दि. 14) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते काश्मीर येथे कार्यरत होते.

डेंग्यू संसर्गाची बाधा झाल्याने ते आजारी होते. दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज शुक्रवारी (दि. 16) दुपारी दोन वाजता त्यांच्यावर सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले.

दिल्ली येथील लष्करी मुख्यालयातील सोपस्कार पार पडल्यानंतर विशेष विमानाने त्यांचे पार्थिव सकाळी साडेदहा वाजता शिर्डी विमानतळावर आणण्यात येणार आहे. तेथून त्यांच्या मूळ गावी पार्थिव नेण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या जवानास अखेरची मानवंदना देण्यासाठी तयारी केली आहे.

गावातील अमरधामकडे जाणारे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात आले असून संपूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली आहे. अमरधाम चा परिसर फुलांच्या माळांनी सजवण्यात आला आहे. रात्रीपासून परिसरात पावसाची संततधार सुरू असली तरी अंतिमसंस्कार ठरल्याप्रमाणे पार पडतील यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील ग्रामस्थांच्या बरोबरीने पुढाकार घेत आहे. जवान गणेश जगताप यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिण, पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post Nashik : आजाराशी झुंज देताना सिन्नरच्या जवानाचे निधन appeared first on पुढारी.