Nashik : उमराणे येथे झोपडीत गॅसचा स्फोट; कुटुंब उघड्यावर

गॅसचा स्फोट,www.pudhari.news

नाशिक (देवळा) ; पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील उमराणे येथील माळी बाबा नगर परिसरात राहणाऱ्या बबीता पोपट माळी यांच्या घरात गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागून एका बारा वर्षाच्या मुलीसह वृद्ध महिला भाजून जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २४)  दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमाराला घडली. जखमींवर उमराणे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सपना पोपट माळी व जिजाबाई महादू माळी अशी जखमींची नावे आहेत.

या परिसरात राहणारे सुनील माळी हे मोलमजुरी करतात. गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून अचानक आग भडकली. आगीने रौद्ररूप धारण करून घरकुल बांधकामासाठी घेतलेले बचत गटाचे 40 हजार रुपये व घरकुलाचा पुढील हप्ता 40 हजार अशी 80 हजार रुपये रोख रक्कम आगीत जळून खाक झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी वस्तूंसह आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आधी महत्त्वाची कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी सापडली. आजूबाजूला राहणाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेजारील तरुणाने गॅस सिलेंडरवर ओली गोधडी टाकल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

घटनेनंतर भारत पेट्रोलियमचे वितरक, तलाठी गणेश जाधव, ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण अहिरराव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माळी कुटुंबाने केली आहे.

मदतीची अपेक्षा  

तानाजी महादू माळी व बबीता पोपट माळी या शेतीकाम व मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाल्यामुळे घरकुलाचा तिसरा हप्ता 40 हजार व बांधकामासाठी बचत गटाकडून घेतलेले अर्थसहाय्य 40 हजार असे एकूण 80 हजार रुपये आगीत जळून खाक झाले. डोळ्यासमोर सर्व संसार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. लवकर शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

The post Nashik : उमराणे येथे झोपडीत गॅसचा स्फोट; कुटुंब उघड्यावर appeared first on पुढारी.