Site icon

Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

विवाहिता व बालकासह पळून आलेल्या २० वर्षीय युवकाने रागाच्या भरात चारवर्षीय बालकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात घडली. या घटनेने हळहळ आणि संतापही व्यक्त होत आहे. दरम्यान, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याचे समजताच युवकाने विवाहिता व मृत बालकाला रुग्णालयात सोडून पळ काढला. मात्र एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत शिताफीने संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

अमोल उर्फ गणेश नाना माळी (२०, रा. बोकडदरे, ता. निफाड) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आरोपी अमोल हा बोकडदरे येथून दोन मुले असलेल्या विवाहितेसह महिनाभरापूर्वी पळून आलेला होता, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. गुळवंच शिवारात एका कांगणे नामक एका शेतकऱ्याकडे दोघेही मोलमजुरीने काम करीत होते. या दोघांकडे कृष्णा नावाचे चार वर्षाचे बालक होते. गुरुवारी (दि. ६) सायंकाळी ६ च्या कामावरून परतल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले. त्यात संशयिताने मारहान केल्यानंतर त्रास होऊ लागलेल्या बालकाला उपचारासाठी सिन्नरला हलविण्यास आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. बालकाला मारहाण प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात आल्यानंतर संशयित गणेश माळी याने ग्रामीण रुग्णालयातून पोबारा केला.

दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस रुग्णालयात दाखल झाले. बालकाची आई काजल माळी हिने पोलिसांसमोर घटना कथन केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक श्यामराव निकम यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताच्या शोधासाठी बोकडदरे हद्दीतील निफाड पोलिस, बोकडदरेचे पोलिस पाटील व सरपंच यांच्याशी संपर्क साधला. संशयिताच्या आई – वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक निकम, सहायक निरीक्षक संदेश पवार, हवालदार बापू महाजन, संजय बागूल, विनोद जाधव, धनाजी जाधव, काकड यांच्या पथकाने तपासकामी बोकडदरा येथे धाव घेतली. तथापि, संशयित आरोपी मिळून आला नाही. त्यानंतर तपासचक्रे फिरवत संशयिताला अटक केली. अमोलच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक संदेश पवार अधिक तपास करीत आहेत.

२४ तासांत आवळल्या संशयिताच्या मुसक्या

संशयित आरोपी अमोलच्या आत्याने आरोपीच्या वडिलांच्या मोबाइलवर फोन केला. त्याचवेळी पोलिसांना आरोपीचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आरोपीच्या आत्याचे घर गाठले आणि संशयित आरोपी अमोल माळीला ताब्यात घेतले.

.अन् संशयिताने रुग्णालयातून ठोकली धूम

चार वर्षांचा कृष्णा अंगात कपडे घालत नसल्याची कुरापत काढून संशयित अमोल माळीने रागाच्या भरात बालकाला काठीने बेदम मारहाण करीत जमिनीवर आपटले. त्यात कृष्णाच्या डोक्याला जबर मार लागला. काही वेळाने त्याला त्रास होऊ लागल्याने तातडीने सिन्नरच्या एका खासगी बालरुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता.

हेही वाचा : 

The post Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Exit mobile version