Nashik : कृषी महोत्सवात आठ जोडपी अडकली विवाहबंधनात

nashik

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे सुरू असलेल्या जागतिक कृषिमहोत्सवात शुक्रवारी (दि. २७) विवाहेच्छुकांच्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी 5 हजार विवाहेच्छुक मुला-मुलींनी आपली नावनोंदणी केली, तर यावेळी झालेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात आठ जोडपी विवाहबंधनात अडकली. यावेळी कळवणमधील ॲग्रो केअर अँड क्रॉप सायन्स इंडस्ट्रिजचे संचालक भूषण निकम यांना ‘कृषी माउली’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी विनामूल्य विवाह नोंदणी व वधू-वर परिचय मेळावा झाला. सेवामार्गाच्या विवाह संस्कार विभागांतर्गत झालेल्या या मेळाव्यात पाच विवाहेच्छुकांनी नोंदणी केली गेली व या वधू-वर परिचय मेळाव्यात जुळलेल्यांपैकी आठ जोडप्यांचा विवाह यावेळी झाला. कन्यादान योजनेद्वारे नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य प्रदान केले.

यावेळी झालेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, सध्या विवाह आणि रोजगार ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, स्वामी समर्थ सेवामार्गातून या दोन्ही गोष्टी एकत्रितरीत्या सोडविण्यासाठी काम सुरू आहे हे सर्वांत पवित्र असे काम आहे. तरुणांनी नोकरी न शोधता नोकरी देण्याचे सामर्थ्य आपल्यात आणावे, शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देताना विचार केला जातो हे चुकीचे आहे, मुलगा बघताना त्याची कमाई न बघता त्याची क्षमता, आचार, विचार, संस्कृती याचा विचार करावा.

यावेळी रोजगार मेळाव्यात बोलताना ज्ञानेश्वर बोडके म्हणाले की, जैविक शेतीला आज खूप महत्त्व आले आहे. भाजीपाला लागवडीपासूनच खरेदीसाठी लोक आजही तयार आहे. मात्र, तो पिकविणाऱ्यासाठी प्रयत्न दिसत नाही. सात्विक भाजीपाल्यासोबतच दुधाला खूप मागणी आहे. त्याच्या व्यवसायवाढीसाठी प्रयत्न होणे आ‌वश्यक असल्याचे त्यांनी आवाहन केले.

The post Nashik : कृषी महोत्सवात आठ जोडपी अडकली विवाहबंधनात appeared first on पुढारी.