Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप

जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खंडणीसाठी युवकावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणात पंचवटीतील निकम बंधुना विशेष मोक्का, जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शेखर राहूल निकम (वय २७) व केतन राहूल निकम (वय १९) असे शिक्षा झालेल्या संशयितांची नावे आहे. या प्रकरणातील संतोष प्रकाश पवार, विशाल चंद्रकांत भालेराव, संदिप सुधाकर पगारे यांची न्यायालयाने मुक्तता केली.

पेठरोडवरील हॉटेल श्रीकृष्ण विलाससमोर २९ जून २०१७ राेजी संदिप अशोक लाड (२९) यांच्याकडे संशयितांनी खंडणी मागितली. मात्र, लाड याने खंडणीला विरोध दर्शविताच संशयितांनी त्यावर रिव्हॉल्वरने गोळीबार केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहायक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ यांनी संशयितांविरोधात सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विशेष मोक्का, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती ए. यु. कदम यांनी शेखर व केतन निकम यांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजारांचा दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. सुधीर कोतवाल यांनी काम बघितले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार एम. एम. पिंगळे व कोर्ट अमंलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक के. के. गायकवाड यांनी गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.

हेही वाचा :

The post Nashik : खंडणीसाठी युवकावर गोळीबार ; पंचवटीतील निकम बंधूंना जन्मठेप appeared first on पुढारी.