Nashik : गडकरींना सांगून झालं, आता इगतपुरीच्या रस्त्याचा प्रश्न विधान भवनात

इगतपुरी रस्ता

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी शहराच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न थेट नागपूर विधान भवनात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दारी पोहचला आहे. मागील आठवड्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई आग्रा महामार्गाच्या कार्यक्रमानिमित्त नुकतीच इगतपुरी येथे भेट दिली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी महेश श्रीश्रीमाळ, इगतपुरी शहराध्यक्ष सागर हंडोरे, तालुका उपाध्यक्ष मुन्ना पवार यांनी मंत्री गडकरी यांची भेट घेऊन इगतपुरीतील अत्यंत महत्वाचा असलेला मुख्य रस्त्याचा प्रश्न केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला होता. त्यावेळी गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना फोन करून हा प्रश्न सोडविण्याबाबत सूचना केली होती.

या पदाधिकाऱ्यांना हा विषय महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा असल्याने त्यांना भेटण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे प्रदेश भाजपा पदाधिकारी महेश श्रीश्रीमाळ, माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, जिल्हा पदाधिकारी पांडुरंग बऱ्हे, शहराध्यक्ष सागर हंडोरे, तालुका उपाध्यक्ष मुन्ना पवार यांनी नागपूर येथे अधिवेशन चालू असताना विधान भवनात जाऊन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेत मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेबाबत गडकरी यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनाही निवेदन दिले.

रवींद्र चव्हाण यांनी गडकरी व माझे याबाबत बोलणे झालेले आहे असे सांगितले. तसेच संबधित अधिकाऱ्यांना त्वरीत या रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठवण्याचे आदेश दिले. सदरील माहिती देतांना भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नाने इगतपुरी येथील मुख्य रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे भाजपा शहराध्यक्ष सागर हंडोरे यांनी सांगितले. तसेच शहर भारतीय जनता पक्ष इगतपुरीतील समस्या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादनही याप्रसंगी सागर हंडोरे यांनी केले.

हेही वाचा :

The post Nashik : गडकरींना सांगून झालं, आता इगतपुरीच्या रस्त्याचा प्रश्न विधान भवनात appeared first on पुढारी.