Nashik : गारठ्याचा आरोग्यावर परिणाम, नागरिकांना सर्दी-खोकल्याचे आजार

खोकला,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिमालयातील बर्फवृष्टी आणि दक्षिण भारतामधील अवकाळी पावसाचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर होत आहे. तापमानाच्या पार्‍यात सातत्याने होणार्‍या बदलामुळे गारठा कायम आहे. विशेषत: पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जाणवत असून, सर्वसामान्यांना सर्दी – खोकल्याचे आजार जडले आहेत.

चालू महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील किमान तापमानात घसरण सुरू आहे. निफाडमध्ये सोमवारी (दि. 14) गत 24 तासांच्या तुलनेत पार्‍यामध्ये 0.5 अंशांची घट होत, तो 12.5 अंशांवर स्थिरावला. तर नाशिकचा पाराही 15.1 अंशांपर्यंत खाली आहे. पार्‍यातील या बदलामागे हिमालयाकडून येणार्‍या शीतलहरी तसेच दक्षिण भारतामधील अवकाळीचे कारण सांगितले जात आहे. नाशिकमध्ये नोव्हेंबरच्या मध्यातच पारा 12 अंशांपर्यंत खाली आल्याने शहरवासीय गारठले आहेत. त्यातच रात्री व पहाटेच्या वेळी थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळे घरटी एक व्यक्ती सर्दी-खोकल्याने आजारी आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांसह ठिकठिकाणी शेकोेट्या पेटविल्या जात आहेत.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत निफाडमध्ये तापमानाच्या पार्‍यात लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे अवघ्या तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. द्राक्षबागांना या हवामानाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टीचा मारा सहन करणार्‍या शेतकर्‍यांसमोर संकट उभे ठाकले आहे. थंडीपासून बागा वाचविण्यासाठी पहाटेच्या वेळी बागांमध्ये धूरफवारणी केली जात आहे.

जिल्ह्याच्या अन्य भागांतही शीत वार्‍यांचा वेग अधिक असल्याने जनता हैराण झाली आहे. विशेषत: पहाटे व रात्रीच्या वेळी बागांना पाणी देण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दैनंदिन ग्रामीण जीवनमानावरही वातावरणातील बदलाचा परिणाम जाणवत आहे.

The post Nashik : गारठ्याचा आरोग्यावर परिणाम, नागरिकांना सर्दी-खोकल्याचे आजार appeared first on पुढारी.