Nashik : गा‌वठी दारूच्या हातभट्ट्या, जुगार अड्डे उद्ध्वस्त

मटका अड्डा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पोलिस ठाणेनिहाय कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार विशेष पथकांनी ग्रामीण भागातील गा‌वठी दारूच्या हातभट्ट्या व जुगार अड्डे शोधून ते उद्ध्वस्त केले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, संशयितांविरुद्ध आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदतही दिली. त्यानुसार ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद होत असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांमार्फत जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई केली जात आहे. या पथकाने वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत इगतपुरी तालुक्यातील मुकणे शिवारात राखाडूच्या डोहाजवळ गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. तिथून हातभट्टीचे साहित्य, रसायन जप्त केले असून, या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे सुरगाणा व सायखेडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रोकडपाडा आणि शिंगवेमध्ये मटका जुगार अड्ड्यांवर छापे मारण्यात आले. तिथेही जुगारबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल असून, संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण आठ गुन्हे दाखल केले असून, त्यात सहा लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ग्रामीण भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील हॉटेल-ढाबे, गावस्तरावरील अवैध अड्डे, अवैध मद्य वाहतूक, अतिदुर्गम भागातील जुगार-मटक्याची ठिकाणे व हातभट्ट्यांची माहिती पोलिसांमार्फत गोळा केली जात आहे. ठोस माहिती मिळताच कारवाई होत असल्याने अवैध धंदेचालकांमध्ये खळबळ उडाल्याचे बाेलले जात आहे.

पोलिस ठाणेनिहाय झालेल्या कारवाई

पोलिस ठाणे —- ठिकाण —– जप्त मुद्देमाल

वाडीवऱ्हे —– राखाडू डोह, मुकणे शिवार —– १,१८,४०० रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा

कळवण —– नांदुरी कळवण रोड —– ४,०९,००० रुपयांची १ ब्रास वाळूसहित ट्रॅक्टर, मोबाइल

दिंडोरी —– जानोरी शिवार —– २४,४५७ रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा

इगतपुरी – न्यू खालसा पंजाबी ढाबा, मुंबई-आग्रा महामार्ग – ५,८९५ रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा

पिंपळगाव —– हॉटेल भोले पंजाब ढाबा, पिंपळगाव बसवंत —– वेळमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई व न्यायालयात खटला दाखल

हेही वाचा :

The post Nashik : गा‌वठी दारूच्या हातभट्ट्या, जुगार अड्डे उद्ध्वस्त appeared first on पुढारी.