Site icon

Nashik : ठेकेदार, मनपाचे पुन्हा छत्तीस गुण जुळले; घंटागाडीला चौकशीतून अभय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ठेकेदार अन् मनपा प्रशासन यांचे दरवेळी ३६ गुण जुळत असल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे. घंटागाडी अनियमिततेबाबत महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या चौकशीला मान्सूनपूर्व कामांच्या प्राधान्यतेचे कारण देत एकप्रकारे ब्रेक दिला आहे. आधी गटारी, नालेसफाई या कामांवर फोकस केला जाईल, त्यानंतरच घंटागाडी चौकशीला वेळ दिला जाईल, अशी भूमिकाच प्रशासनाने घेतल्याने पुन्हा एकदा ३६ गुण जुळल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगत आहे. (Nashik)

महापालिका घंटागाडी ठेक्याने दीडशेवरून थेट साडेतीनशे कोटींचे घेतलेले उड्डाण हा वादाचा विषय ठरला होता. एवढे पैसे मोजूनही घंटागाडी सेवेत अनियमितता असून, त्याकडे वर्षानुवर्षे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. कचरा विलगीकरण न करणे, गाड्यांची खटारा अवस्था व देखभाल नसणे या तक्रारी प्राप्त झाल्याने तत्कालीन प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घंटागाडी अनियमितता प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. पण ठेकेदार प्रेमापोटी गमे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यापर्यंत संबंधित अधिकार्‍यांची मजल गेली होती. मात्र, चौकशीत टाळाटाळ केल्यास संबंधित अधिकार्‍यांवरच कारवाईचा पवित्रा गमे यांनी घेतल्याने उशिराने का होईना चौकशी सुरू झाली. या प्रकरणी समिती सदस्य रोज फिल्डवर जात पाहणी करत निरीक्षणे नोंदवत होते. पण अचानक जोरात सुरू असलेल्या या चौकशीचा वेग चालू आठवड्यात मंदावला आहे.

मान्सूनपूर्व कामांवर भर दिला जात असून, त्यात नालेसफाई, रस्ते खड्डे बुजविणे या कामांना अधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चौकशीचा वेग व आवेष दोन्ही थंडावल्याचे पाहायला मिळते. मान्सूनपूर्व कामे महत्त्वाची असली तरी अचानक चौकशीचा वेग मंदावल्याने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मान्सूनपूर्व कामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर घंटागाडी चौकशीला वेळ दिला जाईल.

– भाग्यश्री बानायत, प्र. आयुक्त, मनपा

हेही वाचा :

The post Nashik : ठेकेदार, मनपाचे पुन्हा छत्तीस गुण जुळले; घंटागाडीला चौकशीतून अभय appeared first on पुढारी.

Exit mobile version